केरळच्या इडुक्कीत भूस्खलन; 13 मजुरांचा मृत्यू, मलब्याखाली 70 जण दबल्याचा संशय

430

केरळमध्ये मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. शुक्रवारी इडुक्की जिल्ह्यात राजमाला येथे भूस्खलन होऊन चहाच्या मळ्यात काम करणाऱया मजुरांची वसाहतच वाहून गेली. यात 13 मजुरांचा मृत्यू झाला असून 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मलब्याखाली 70 जण दबल्याचा संशय आहे. दुर्घटनेत मरण पावलेले सर्व मजूर तामिळनाडूचे असल्याचे सांगण्यात आले.

इडुक्की जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. राजमाला येथे डोंगरपायथ्याशी चहाच्या मळ्यात काम करणाऱया मजुरांची वसाहत आहे. या ठिकाणी एकुण 80 मजूर राहत होते. हे सर्व मजूर तामिळनाडूमधील आहेत.

पाच जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने मलप्पुरम, एर्नाकुलम, त्रिशूर, वायनाड आणि इडुक्की या पाच जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा दिला. अगोदरच चार दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे चालियार, पेरियार, मुथिरापुझा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. महापुराचे पाणी अनेक गावांत घुसले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या