हॉटेलमध्ये बोलावून मारहाण केली, कपडे उतरवायला लावले; अभिनेत्याचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, चित्रपटसृष्टी हादरली

चित्रपटसृष्टीतील झगमगत्या पडद्यामागे चालणारे काळे कारनामे पुन्हा समोर येऊ लागले आहेत. काही वर्षापूर्वी ‘मी टू’ मोहिमेद्वारे हॉलिवूड, बॉलिवूडसह टॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. आता मल्याळम चित्रपटसृष्टीतून लैंगिक शोषणाबाबतच्या बातम्या समोर येत आहेत. या चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी समोर येत आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे.

यानंतर अभिनेता मुकेशसह जयसूर्या आणि चित्रपट दिग्दर्शक रंजीत यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आता रंजीत यांच्यावर दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा आरोप कुणा अभिनेत्रीने केला नसून एका अभिनेत्याने केला आहे. केरळ पोलिसांच्या हवाल्याने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

वृत्तानुसार, रंजीत यांनी पीडित अभिनेत्याला ऑडिशनसाठी बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. मात्र तिथे त्याला कथितपणे मारहाण करण्यात आली. तसेच अंगावरील सर्व कपडेही उतरवण्यास सांगितले. मात्र यास नकार दिल्याने पुन्हा मारहाण करण्यात आली.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी रंजीत यांनी सदर अभिनेत्याला पैसेही ऑफर केले. ही घटना 2012 मध्ये घडलेली असून पीडित अभिनेत्याच्या तक्रारीनंतर कोझीकोड पोलीस स्थानकात रंजीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजीत यांचा राजीनामा

दरम्यान, याआधी बंगाली अभिनेत्रीने रंजीत यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रंजीत यांनी केरळ राज्य चलचित्र अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर केरळ सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले आणि या संदर्भात हेमी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर आरोपांची चौकशी करण्यासाठी रविवारी सात सदस्यीय विशेष तपास पथकाची समिती नेमली. त्यामुळे आगामी काळात मल्याळम चित्रपटसृष्टीतील आणखी काही काळे कारनामे समोर येण्याची शक्यता आहे.