ऐतिहासिक खांदेरी किल्ल्यावर दारू पिणाऱ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांचा बीमोड करण्यासाठी उभारलेल्या खांदेरी किल्ल्यावर दारू पिणाऱ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. रविवारी 8 डिसेंबरला संध्याकाळी हा प्रकार घडला असून यामध्ये 5-6 जण जखमी झाले आहेत. या जखमींवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अलिबागजवळ समुद्रात असलेल्या खांदेरी किल्यावर मुंबई येथून पन्नास ते साठ जण सहलीसाठी आले होते. त्याचवेळी आक्षी येथील तीस ते चाळीस जणांचा गटही सहलीसाठी आला होता. खांदेरी किल्यात असलेल्या वेताळ देवाला मान देण्यासाठी हा गट आला होता. पूजा झाल्यानंतर या गटातले सगळे जण दारू प्यायला बसले. मुंबईहून आलेला गटही दुसऱ्या बाजूला दारू प्यायला बसला होता. यावेळी आक्षीहून आलेल्या गटातील तरुणाने मुंबईहून आलेल्या तरुणांकडे फोन करायचाय असं सांगून मोबाईल मागितला. यावर मुंबईतील पर्यटकाने त्याला नंबर सांग फोन लावतो असे सांगितले. याचा राग आल्याने फोन मागणाऱ्याने मुंबईहून आलेल्या तरुणाच्या हातातला फोन घेतला आणि पाण्यात फेकला. त्यावरून दोन्ही गटात बाचाबाचीला सुरुवात झाली.

बाचाबाची थोडावेळ झाल्यानंतर दोन्ही गट शांत झाले. संध्याकाळी मुंबईतील तरुण परत निघाले होते. यावेळी त्यातल्या एकाने आक्षीहून आलेल्यांकडे बघत ‘निघतो भावांनो’ असं म्हणत शिवी दिली. यावर आक्षीतील तरुणांनीही त्याला शिवी दिली. यानंतर बाचाबाचीऐवजी थेट हाणामारीला सुरूवात झाली. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील तरुण जखमी झाले आहेत.