खार सब-वे पूरमुक्त होणार, 15 वर्षांनंतर नेमके कारण सापडले

चार फुटांपर्यंत पाणी साचून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय होणाऱया खार सब-वेची या वर्षी मात्र पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा त्रास होत आहे. या ठिकाणच्या नाल्याचा प्रवाह खंडित असल्यामुळे पाणी साचत असल्याचे समोर आल्यामुळे पालिका या वर्षी उपाययोजना करीत आहे.

खार सब-वेमध्ये दरवर्षीच पाणी तुंबल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेला या ठिकाणी पंप बसवावे लागतात. हा भाग बाजूच्या रस्त्यापेक्षा सखल असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. या ठिकाणचा खार गोळीबार उदंचन केंद्राजवळील नाल्याचा प्रवाह खंडित झाला आहे. शिवाय केंद्रीय प्राधिकरणांच्या हद्दीत असलेल्या नाल्याचे रुंदीकरण-खोलीकरणही झालेले नाही. त्यामुळे खंडित झालेल्या वाहिन्या बदलल्या जाणार असून क्षमताही वाढवण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका 8 कोटी 45 लाख रुपये खर्च करणार आहे.

असे होणार काम

सब-वेमधील जुन्या नाल्यांऐवजी नव्या जास्त क्षमतेच्या आरसीसी वाहिन्या बांधण्यात येणार आहेत. तर रक्षा संशोधन व विकास संस्था, वायुसेनेच्या अखत्यारीत असलेल्या भागातील नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच खंडित असलेल्या नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या