
तालुक्यातील खर्डा हे महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा, मोठे तीर्थक्षेत्र आणि बाजारपेठ असलेले गाव आहे. येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून, दुरुस्ती व सोयीअभावी हे विश्रामगृह तळीरामांचा अड्डा बनले आहे. याकडे पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खर्डा येथे जिल्हा परिषदेचे असलेले हे विश्रामगृह एकेकाळी तालुक्यातील राजकीय व सामाजिक हालचालींचे महत्त्वाचे केंद्र होते. त्यातच 2009 साली तत्कालीन पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांच्या प्रयत्नातून या विश्रामगृहाची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच नवीन फर्निचरची कामे झाली व परत एकदा या वास्तूला गतवैभव प्राप्त झाले होते. परंतु सध्या ही सरकारी वास्तू वापराविना पडून आहे. वास्तूलगतच्या मोकळ्या जागेत जंगली गवत, झाडेझुडपे वाढली आहेत, दारूच्या मोकळ्या बाटल्यांमुळे परिसराला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. विश्रामगृहाच्या संरक्षण भिंतीची काही ठिकाणी पडझड झाली असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्याचप्रमाणे या विश्रामगृहात राहणाऱया कर्मचाऱयांच्या खोलीची पडझड होऊन दुरवस्था झाली. पूर्वी या ठिकाणी विश्रामगृहाच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱयाची नियुक्ती होती; सध्या तिथे कोणीही कर्मचारी नसल्याने हा परिसर तळीराम व नशेबाजांचा अड्डा बनले आहे.
शिर्डी-हैदराबाद महामार्गालगत साधारण एक एकरमध्ये संरक्षण भिंतीसह हे विश्रामगृह उभे आहे. त्यामुळे या विश्रामगृहाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

































































