
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जीप चालकाने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातात खेड भरणे मार्गावरील स्वरूप नगर नजीक रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील जीप ही पाटबंधारे विभागाची असून सध्या त्या जीपचा वापर कोविड 19 भरारी पथक करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भरणे बाईतवाडी येथे राहणारा सुनील उर्फ भालू भालेकर हा रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास खेड येथून आपल्या घरी जायला निघाला होता. तो स्वरुप नगर येथे पोहचला असता समोरून भरधाव आलेल्या जीपने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील हा रस्त्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खेड येथील इलक्ट्रिक दकानाचे मालक रहिम सहिबोले यांनी याबाबत खेड पोलिसांना खबर दिल्यावर खेड पोलिसांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला. त्यानंतर सुनील भालेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खेड नगरपालिकेच्या रुग्णालयात पाठव्यात देण्यात आला.
पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत जीप चालवून अपघात घडविणारा जीप चालक निलेश मनोहर शिंदे याला ताब्यात घेतले आहे. या चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता अपघाताच्या वेळी त्याने मद्य प्यायल्याचे स्पष्ट झाले आहे.



























































