विनामास्क फिरणाऱ्यांवर खेडमध्ये कारवाई, 1 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी खेड नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यांनी खेडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसात विना मास्क फिरणाऱ्यांकडून प्रशासनाने तब्बल 1 लाख 32 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या बाबत माहिती देताना खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे म्हणाले, फेब्रुवारी महिन्यापासून खेड तालुका आणि शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाला रोखायचे असेल तर शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.. गेले अनेक दिवस आम्ही जनतेला हेच आवाहन करत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी शहरात फिरताना मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर पाळा, सॅनिटायझरचा वापर करा. मात्र नागरिकांकडून प्रशासनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मार्केटमध्ये गर्दी करू नका सांगूनही गर्दी होत आहे. मास्क चा वापर केला जात नाही. सामाजिक अंतर पाळावे असे कुणालाही वाटत नाही त्यामुळे अखेर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे.

पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर, सामाजिक अंतर न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू लागले आहे. गेल्या चार दिवसात कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या अनेकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. जे नागरिक कोरोना नियमांचा भंग करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरूच राहील असे शिंगटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.