भाजपची सत्ता हटेपर्यंत संपूर्ण देशभर ‘खेला होबे’ – ममता बॅनर्जी

जोपर्यंत संपूर्ण देशातून भाजपची सत्ता जात नाही तोपर्यंत देशभर ‘खेला होबे’ साजरा केला जाईल. सर्व राज्यांमध्ये ‘खेला’ होईल. 16 ऑगस्टपासून ‘खेला दिवसा’ची सुरुवात केली जाईल, असा निर्धार तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला. तसेच ‘बीजेपी हटाओ, देश बचाओ’ असा नारा देत सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहनही केले.

ममता बॅनर्जींनी बुधवारी शहीद दिवसानिमित्त उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरातसह अन्य राज्यांमध्ये मेगा व्हर्च्युअल सभा घेतल्या. बंगालची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता आमचे लक्ष दिल्लीकडे असल्याचे जाहीर करीत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

कोरोना महामारीतील केंद्र सरकारचे अपयश, देशभरातील इंधन दरवाढीचा भडका तसेच ‘पेगासस’च्या माध्यमातून होत असलेले पह्न टॅपिंग आदी मुद्दय़ांवरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप हा ‘हुकुमशहा’ आणि कोरोनापेक्षाही भयानक विषाणू असल्याचा बेधडक आरोपही यावेळी केला. त्यांनी विविध राज्यांमध्ये व्हर्च्युअल सभा घेत तेथील जनतेला उद्देशून केलेले भाषण केले.

आपली प्रतिक्रिया द्या