राज्य अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो : पुण्याला दुहेरी अजिंक्यपदाची संधी!

361

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर हौशी  खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली उत्कर्ष क्रीडा मंडळ व हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर आयोजित  56 व्या  पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत  पुरुषांमध्ये मुंबई उपनगर विरुद्ध पुणे तर महिलांमध्ये ठाणे विरुद्ध पुणे अशा अंतिम लढती रंगणार आहेत. या स्पर्धेत पुण्याला दुहेरी अजिंक्यपद मिळवण्याची संधी चालून आली आहे.

रविवारी  झालेल्या पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याने सांगलीवर 20-18  (10-09 , 10-09) असा अतिशय चुरशीचा  दोन गुणांचा  विजय मिळवला. या सामन्यात पुण्याच्या अक्षय गणपुलेने एक मिनिट तीस सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करून तीन खेळाडूंना बाद केले. सुयश गरगटेने एक मिनिट तीस सेकंद एक मिनिट संरक्षण करून चार खेळाडू बाद केले. सागर लेंगरेने दोन्ही डावांत प्रत्येकी एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले आणि विजयश्री खेचून आणली.

पुरुषांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरने  शेजारी ठाण्यावर 21-20  (11-10, 09-11) असा अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात एक गुणाने विजय मिळवला. मुंबई उपनगरच्या नितेश रुकेने एक मिनिट तीस सेकंद व एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले.

महिलांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत  पुण्याने रत्नागिरीचा 9-07  (9-4 , 0-3 ) असा  एक डाव दोन गुणांनी पराभव केला. पुण्याच्या स्नेहल जाधवने दोन्ही डावात प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण करून आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. भाग्यश्री जाधवने एक मिनिट वीस सेकंद व नाबाद दोन मिनिटे संरक्षण करून एक खेळाडू बाद केला.

आपली प्रतिक्रिया द्या