खोपोली नगरपालिकेचा तुघलकी कारभारः जेसीबीने 18 झाडांची केली कत्तल

नाल्याचे काम सुरू असताना वृक्षप्रेमींनी लावलेल्या 18 झाडांची कत्तल केल्याचा प्रकार खोपोलीत उघडकीस आला आहे. ठेकेदाराच्या या कारनाम्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून खोपोली नगरपालिकेच्या तुघलकी कारभारावर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा नगरपालिकेकडून विसर पडला असल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

खोपोली नगरपालिका हद्दीतील लवजी, चिंचवली भागात विकसित होणाऱ्या रस्त्याच्या कडेला वृक्षप्रेमींनी झाडे लावली होती. ही झाडे बऱ्यापैकी मोठीही झाली होती. पावसाळ्यापूर्वी नाल्याची खुदाई दाइ करताना ठेकेदाराने जेसीबी लावून चक्क झाडे छाटली आहेत. हे काम करत असताना नगरपालिकेचा कुठलाही जबाबदार अधिकारी त्याठिकाणी नव्हता त्यामुळे भरदिवसा ठेकेदाराने झाडांवर कुऱ्हाड चालवली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वृक्षप्रेमींनी लावलेली झाडे मोठी झाली असतानाही कुठलीही सुरक्षितता न बाळगता ही झाडे मुळासकट तोडून टाकली आहेत. ही झाडे संबंधित ठेकेदाराकडून पाच पटीने लावून घ्यावी, अशी ही मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.