
मोरया मंगल कार्यालय, पुणे येथे पिंपरी-चिंचवड किक बॉक्सिंग असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या वेदांत कायंदेकर, मुंबईची सान्वी जाधव व भूषण देशमुखने सुवर्णपदकाची कमाई केली. आदर्श कानूने स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंची बालेवाडी, पुणे येथे होणाऱया वाको महाराष्ट्र राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नवी मुंबईतील वेदांत कायंदेकरने पॉइंट फाइट प्रकारात सुवर्णपदक तर म्युझिकल फॉर्म प्रकारात कास्यपदक पटकावले. वेदांतच्या या यशाबद्दल त्याच्या आयसीएलईएस कॉलेजच्या प्रिन्सिपॉल डॉ. पूनम सिंग यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. या सर्व खेळाडूंना युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेचे मार्गदर्शक, अध्यक्ष व महाराष्ट्र वाको असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, मनीष पनवेलकर आणि समीक्षा कायंदेकर यांच्याकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व विजेत्या खेळाडूंचे वाको महाराष्ट्र अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी खास कौतुक केले आहे.


























































