अशी ही श्रीराम भक्ती! दुर्बिणीशिवाय लाखो तांदुळावर एका बालकाने लिहिले ‘श्रीराम’

2288

>> राजेश देशमाने 

श्रीराम नामाच्या भक्तीचे विविध रुपे आपण पाहिले व ऐकले आहे. परंतु एका चौदा वर्षीय नववीत शिकणार्‍या आकाश गजानन बाजड या बालकाने दुर्बिणीशिवाय दोन महिन्यात 1 लाख 10 हजार तांदुळावर राम लिहिले असून येणार्‍या 15 दिवसात पुन्हा 40 हजार तांदुळावर तो राम लिहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणार आहे. त्याच्या या श्रीराम नामाच्या भक्तीचे सगळीकडे कौतूक होत आहे.

तांदळाच्या दाण्यावर नाव लिहिण्याचे आपण ऐकलेच असेल. अलीकडे त्याचे कीचैन बनवूनही विक्री केली जाते. मात्र, त्यासाठी दुर्बिणीचा वापर केला जातो. पण आकाश बाजड या विद्यार्थ्याने दुर्बिणीशिवाय ‘राम’ नाम लिहिले आहे. बाजड कुटूंबीय मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मुंदेफळचे (ता. मेहकर). आकाशचे वडील गजानन बाजड हे सध्या नोकरीनिमित्त भोसरी-पुणे येथे राहतात. त्यांनी तीन वर्षापूर्वी चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील 80 पानांचे 20 धडे ‘ए-फोर’ आकाराच्या पानावर एकाच बाजुला लिहिण्याची, पोस्टकार्डवर वंदेमातरमचे संपूर्ण गीत 202 वेळा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘हे राम’ शब्द 40 हजार वेळा लिहिण्याची किमया साधली होती. वंदेमातरम गीत पोस्टकार्डवर लिहिल्याबद्दल त्यांची ‘इनक्रेडेबल बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये देखील नोंद झली होती. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आकाशने हा संकल्प केला. याबाबत गजानन बाजड म्हणाले, आकाशने दोन महिन्यापासून या कामास सुरुवात केली. रोज सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत शाळा, शिकवणी वर्ग आणि गृहपाठ आटोपून तो हे काम करतो. नारंगी, निळा, लाल, हिरव्या अशा एकूण 12 रंगामध्ये तो राम नाम लिहित आहे.

यापूर्वी, आंध्र प्रदेशातील किरणमाई कोटला यांनी पाच महिन्यात 1 लाख 25 हजार तांदळांवर एकाच रंगात श्रीराम लिहिले. त्यामुळे, आकाशची ही कामगिरी पुर्ण झाल्यानंतर त्याची ‘इंडिया बुक’, ‘इनक्रेडेबल बुक’, ‘आशिया बुक’ आणि ‘लिम्का बुक’मध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. आकाश ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयात भोसरी पुणे येथे नववीमध्ये शिकत आहे. वडिलांचे पाहूनच माझ्यामध्ये लहान अक्षरात लेखन करण्याची आवड निर्माण झाली. येत्या 15 दिवसात दीड लाखांवर तांदळाच्या दाण्यांवर राम नाम लिहिण्याचे माझे उद्दिष्ट पुर्ण होणार असल्याचे आकाश बाजड याने ‘दै.सामना’शी बोलताना सांगितले. श्रीरामाचा प्रचंड भक्त असलेल्या आकाशने आजच्या राम मंदिराबाबत आलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचा आनंद व्यक्त करुन आज तो दिवसभर तांदळावर श्रीराम लिहिण्याचे काम करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या