
चंद्रपूरच्या मिंथूर गावामधील शेतकऱ्यावर सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकण्याची नामुष्की आली. किडनी विक्री रॅकेटच्या माध्यमातून संघटितपणे शेतकऱ्याच्या गरिबीचा फायदा घेत हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज विधान परिषदेत केली.
चंद्रपूरमध्ये रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले 1 लाखाचे कर्ज फेडण्यासाठी अवाजवी व्याजामुळे 74 लाख लाखांवर पोहोचले. कर्जफेडीसाठी कुठलाच आर्थिक मार्ग नसल्याने किडनी विक्री रॅकेटने शेतकऱ्याच्या अडचणीचा फायदा घेतला. याबाबत शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यावर कर्जफेडीसाठी आठ ते दहा लाखांना अक्षरशः किडनी विकावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नार्वेकर यांच्या मागणीनुसार संबंधित गुन्हेगारांवर मोक्का लावण्यासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सावकारांवर फौजदारी कारवाई, परवाने रद्द करणार – मुख्यमंत्री
सावकारी कर्जासाठी प्रतिवर्षी व्याजदर निश्चित केला असून शेतकऱ्यांकरिता तारण कर्ज 9 टक्के, विनातारण 12 टक्के व शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर तारण कर्ज 15 टक्के व विनातारण कर्ज 18 टक्के वार्षिक व्याजदर केले आहेत. बेकायदेशीर सावकारीविरोधात सावकारी अधिनियम – 2014 नुसार कारवाई करण्यात येत असून संबंधित तालुका पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चंद्रपूरमध्ये अशा प्रकारांबाबत तक्रारी करण्यासाठी 7887890100 हा व्हॉट्सऍप कमांकही जाहीर करण्यात आल्याचे ते म्हणाले. तक्रारी आल्यास सावकारांचे परवाने रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

























































