दादा, प्लीज आरे वाचवा! बच्चे कंपनीची आदित्य ठाकरे यांना कळकळीची विनंती

2391

आरेच्या जंगलातील झाडे तोडून मेट्रो कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींकडून जोरदार विरोध होत आहे. ‘सेव्ह आरेमोहिमेत आबालवृद्ध सहभागी झाले आहेत. ठिकठिकाणी मानवी साखळ्या बनवून आपला विरोध दर्शवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बच्चे कंपनीने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना आरे वाचवण्यासाठी कळकळीची विनंती केली.

आरे बचाव मोहिमेत 2016 पासून सक्रिय असलेले पाच वर्षे वयाचे अर्जुन मेहता, सिद्धार्थ आणि साईशा यांनी मातोश्रीनिवासस्थानी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आरेच्या जंगलातील जैवविविधतेबाबत एम्पॉवर फाऊंडेशनया स्वयंसेवी संस्थेने संयुक्त राष्ट्राला सादर केलेला अहवाल या मुलांनी त्यांना दाखवला. या मुलांनी 2016 मध्ये आरेबाबत मोदी अंकल सेव्ह आरेहा व्हिडीओ बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांना पाठवला होता.

शिवसेनेने पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर आरेचा बचाव होईल असा विश्वास आम्हाला आहे असे अर्जुनच्या आई शीतल मेहता यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांना आरे आणि तेथील जैवविविधतेबद्दल चांगली माहिती आहे. मुंबईला ऑक्सिजन पुरवणारा आरेचा निसर्ग कायम राहिला पाहिजे. ही पुढच्या पिढीची गरज आहे असे आदित्य ठाकरे यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती साईशा हिचे वडील रिधीश कोठारी यांनी दिली. या भेटीमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुलांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या व्हिडीओचीही प्रशंसा केली आणि मीसुद्धा तुमच्या बरोबर आहे असे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या