किरवलीमधील शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडी मोलाचा दर, रेल्वे प्रशासनाकडून फसवणूक

555

मध्य रेल्वेमार्फत कर्जत पनवेल असा दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत, वाळज, मुद्रे यासह किरवली ग्रामपंचायत हद्दीतील 33 शेतकऱ्यांची 4 एकर जमीनही संपादित केली जात आहे. मात्र इतर गावातील ग्रामस्थांना जमिनीची चांगली किंमत दिली जात असताना किरवली ग्रामस्थांची जमीन कवडी मोलाने खरेदी करून केंद्र सरकारने दुटप्पी भूमिका घेऊन फसवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या सापत्न भूमिकेविरोधात किरवली ग्रामस्थ हे अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आम्हालाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे जमिनीचा दर द्यावा अशी मागणी किरवली ग्रामस्थांनी केलेली आहे.

कर्जत पनवेल दरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम मध्य रेल्वेकडून सुरू झाले आहे. यासाठी कर्जत तालुक्यातील रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. कर्जत, वाळज, मुद्रे, या गावातील जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. या गावातील प्रकल्पबधित शेतकऱ्यांना 10 ते 15 लाख गुंठा जमिनीचा दर देण्यात आलेला आहे. किरवली गावातील ग्रामस्थांच्याही 4 एकर जमीनी संपादित होत आहेत. किरवली हे गाव कर्जत नगरपालिकेला लागून आहे. असे असताना किरवली ग्रामस्थांच्या शेतजमिनीला फक्त 4 लाख 20 हजार दर मध्य रेल्वे देत आहेत.

किरवलीमधील शेतकऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने दुटप्पी भूमिका घेत असल्याने आम्हाला वेगळा न्याय का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेविराधात किरवली शेतकऱ्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन केले आहे. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती आणि निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. त्यांनीही याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणी करतो असे सांगितले आहे.

आम्हालाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे जमिनीचा दर द्या, दुहेरी रेल्वे मार्गात भूसंपादीत जमिनी व्यतिरिक्त असलेली जमीनही ओसाड होणार असल्याने त्याचाही मोबदला मिळावा, घरातील एकास नोकरी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या