
चुकीच्या माहितीवरून बेताल आरोप करणे चुकीचे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपात प्रवेश केलेल्या साखर कारखानदारांकडून प्रथम माहिती घ्या. कोल्हापुरातील शांतता बिघडेल असे वागू नका, बोलण्यावर संयम ठेवा, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिला आहे.
सोमय्या यांना अडवू नका, त्यांच्या कोल्हापूर दौऱयात आपला पक्ष बदनाम होईल अशी घटना घडू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कोल्हापूर जिल्हाबंदी आदेशामुळे सोमवारी सोमय्या यांना कराडमधूनच परत फिरावे लागले. आता पुन्हा श्रीअंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी वा बुधवारी कोल्हापुरात येणार असल्याचे सोमय्यांनी सांगितल्याने जिह्यात तणाव निर्माण झाला आहे.



























































