कोबे ब्रायंट – अचूकतेचे दुसरे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निमिष वा. पाटगावकर

कुठच्याही खेळात सलग दोन दशके कारकीर्द गाजवायला किती कठोर मेहनत लागते, खेळातील नवनवीन आव्हानं, नियम यांना सामोरे जात आणि व्यावसायिकपणा जपत सलग दोन दशकं बास्केटबॉल खेळातील अनेक विक्रम कोबे ब्रायंटने रचले. महत्त्वाकांक्षा आणि मेहनत हेच त्याच्या आयुष्याचं ब्रीद होतं. यामुळेच त्याची लोकप्रियता कालातीत राहील.

शनिवार 25 जानेवारीची रात्र. स्थळ फिलाडेल्फिया. लॉस एन्जलिस लेकर्स संघाचा बास्केटबॉल सामना फिलाडेल्फियाच्या संघाविरुद्ध होता. सगळ्यांचे लक्ष लागले होते ते लेकर्सच्या आजच्या सुपरस्टार लेब्रॉन जेम्सवर. आज तो एका विक्रमला गवसणी घालणार होता. या सामन्याआधी बास्केटबॉलचा जादूगार कोबे ब्रायंटचा तो कारकीर्दीतील एकूण गुणांचा विक्रम मोडायच्या उंबरठय़ावर होता. लेब्रॉन जेव्हा कोवळा मुलगा होता तेव्हा बास्केटबॉलच्या एका कॅम्पमध्ये तेव्हाचा सुपरस्टार कोबे ब्रायंट मार्गदर्शनासाठी येणार होता. इतर सर्व मुलांप्रमाणेच कोबेचा सल्ला लेब्रॉनने जीवाचे कान करून ऐकला, ‘एखाद्या गोष्टीत तुम्हाला सर्वोत्तम व्हायचा प्रयत्न करायचा असेल आणि त्यात महान व्हायचे स्वप्न बघायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनतीला पर्याय नाही’. कोबेचे हे वाक्य हृदयावर कोरत लेब्रॉन जेम्सने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि ज्याच्या प्रेरणेने हे घडले त्या गुरू कोबे ब्रायंटला एकूण गुणसंख्येत मागे टाकून पुढे जायला त्याचा हा शिष्य गेल्या शनिवारी तयार होता. हा विक्रम मोडताना कोबेचे ऋण जाणून लेब्रॉनने आपल्या बुटांवर “Mamba 4 Life” कोरले होते. मांबा हे कोबे ब्रायंटचे टोपण नाव.

अपेक्षेप्रमाणे लेब्रॉनने कोबेला पार केले, पण लेकर्सला तो जिंकवू शकला नाही. सामन्यानंतर कोबेने ‘असाच हा खेळ पुढे नेत जा…खूप आदर माझ्या भावा’ असा संदेश लेब्रॉनला लगेच पाठवला. विक्रम केला तरी सामना गमावला ही खंत लेब्रॉनला लागली असेल, पण दुसऱ्या दिवशी तो एका सामन्याच्या पराभवापेक्षा खूप काही जास्त गमावणार होता. 26 जानेवारीची सकाळ उजाडली तीच एका अशुभ बातमीने. बास्केटबॉलचा जादूगार कोबे ब्रायंट, त्याची तेरा वर्षांची कोवळी मुलगी जियाना आणि बाकीच्या 7 प्रवाशांचे हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले. काल ज्याच्याकडून आपण स्वतः अभिनंदन स्वीकारले तो अचानक या जगाचे कोर्ट सोडून निघून गेला हे त्या लेब्रॉनला जितके धक्कादायक होते तितकेच सर्व जगभर पसरलेल्या कोबे ब्रायंटच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होते. या बातमीने अमेरिकेचे क्रीडा विश्व तर हादरलेच, पण ते हादरे सर्व जगभर पसरले. बास्केटबॉल हा खेळ जगभर खेळला जात असला तरी त्याची मुख्य कर्मभूमी अमेरिका आहे ते खचितच जगातल्या इतर बास्केटबॉल लीगना असेल. तेव्हा कोबेचा मृत्यू हा अगदी हिंदुस्थानातील क्रीडा जगतालाही हलवून गेला.

कुठच्याही खेळात सलग दोन दशके कारकीर्द गाजवायला किती कठोर मेहनत लागते, खेळातील नवनवीन आव्हानांना, नियमांना सामोरे जात आणि व्यवसायिकपणा जपतानाच आपल्या फिटनेसला कसे जपावे लागते हे आपण तेंडुलकर, लिअँडर पेस यांची कारकीर्द घडताना बघितलेच. कोबे ब्रायंटही त्याच जातकुळीचा होता आणि म्हणूनच महान होता. कोबे मूळचा फिलाडेल्फियाचा. बास्केटबॉलचे बाळकडू त्याला वडील खेळाडू असलेल्या जो ब्रायंट यांच्याकडून मिळाले होते. त्याचे एक मामाही बास्केटबॉल खेळायचे. आजकाल आपण आयपीएल किंवा फुटबॉल लीगमध्येही बघतो ते म्हणजे खेळाडू आपला संघ बदलत असतात, पण कोबेचे वैशिष्टय़ म्हणजे कारकीर्दीची वीसच्या वीस वर्षे कोबे फक्त लेकर्स संघाकडूनच खेळला.

मला कोबेच्या कारकीर्दीत आणि सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीत विलक्षण साम्य जाणवते. शाळकरी वयात दोघेही व्यावसायिक खेळाडू बनले. दोघांनाही आपल्या क्षमतेबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता आणि त्याप्रमाणे त्यांनी आपली कारकीर्द घडवली. दोघांनी कारकीर्दीत बरोबरच्या खेळाडूंच्या अनेक पिढय़ा बघितल्या.

एखादा खेळाडू अर्थातच पहिल्या सामन्यापासून जरी आपल्या गुणांची झलक दाखवत असला तरी तो महान पहिल्या सामन्यापासून होत नाही. उमेदीच्या काळात त्याला संघातील प्रस्थापितांशीच पहिला सामना करून आपले मूल्य पटवून द्यायचे असते. केवळ 17 वर्षांच्या कोवळ्या कोबेने आपल्या पदार्पणाच्या लेकर्सच्या साखळी सामन्यातच 21 गुण कमावून आपल्या आगमनाची वर्दी जगाला दिली होती, पण सुरुवातीच्या काळात कोबे त्या काळी लेकर्सचा शहेनशहा असलेल्या शकील ओ’नीलच्या कामगिरीच्या छायेत वावरत होता. शकील आणि कोबे हे दोघेही लेकर्सचे आधारस्तंभ होते आणि जरी जशी एकाच संघातील दोन मातब्बर खेळाडूंत धुसफूस असते तशी यांच्यातहा थोडीफार असली तर 2000 ते 2002 ही सलग 3 वर्षे त्या दोघांनी लेकर्सला NBA चे अजिंक्यपद मिळवून दिले होते. 2004 साली NBA चा अंतिम सामना लेकर्सने हरल्यावर त्यांनी शकीलची संघातून मुक्तता केली आणि कोबे ब्रायंट हा लेकर्सचा आधार झाला. त्यांनतर अव्याहतपणे त्याने लेकर्सचा झेंडा निवृत्तीपर्यंत म्हणजे 2016 पर्यंत उंचावला. त्यात 2009 आणि 2010 या लागोपाठच्या दोन वर्षांतील अजिंक्यपदेही आली.

आपल्या वीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत कोबेने अनेक विक्रमांच्या आकडय़ांना गवसणी घातली. प्रत्येक सामन्यात त्याची 25 गुणांची सरासरी, 5.2 रिबाऊंड्स, 4.7 असिस्ट आणि 1.4 स्टील अशी आकडेवारी असणारा कोबे बास्केटबॉलच्या दुनियेतील 30 हजार गुण आणि 6 हजारवेळा असिस्ट करणारा एकमेव खेळाडू आहे. एका सामन्यात तब्ब्ल 81 गुण मिळवून तो एका सामन्यात जास्तीत जास्त गुण मिळवायच्या यादीत दुसरा आहे. एका सामन्यात पन्नासपेक्षा जास्त गुण त्याने 24 वेळा तर 60 पेक्षा जास्त गुण त्याने 6 वेळा मिळवले आहेत. 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिकमधील बास्केटबॉलचे सुवर्णपदक अमेरिकेला त्याने मिळवून दिले होते. NBA मध्ये सलग 18 वेळा तो ऑल स्टार होता, तर 2007 -08 साली तो हंगामाचा अतिविशिष्ट खेळाडू (MVP) होता. या MVP खेळाडूच्या कारकीर्दीला एकच डाग लागला तो म्हणजे 2003 साली त्याचे नाव एका लैंगिक अत्याचारात गोवले तेव्हा.

कोबेची आकडेवारी त्याला महान करतेच, पण त्याने खेळाचा सदिच्छा दूत म्हणून केलेला प्रसार त्याला महान खेळाडू बनवते. नुसते लेकर्स नाही तर त्याचे चाहते सर्व संघात होते हे एकाच उदाहरणावरून दिसून येईल. 2 फेब्रुवारी 2009 ला जो सामना लेकर्स आणि न्यूयॉर्क निक्स संघात न्यूयॉर्कला झाला तेव्हा या एका सामन्यात जेव्हा कोबेने 61 गुणांची कमाई केली तेव्हा न्यूयॉर्कचे प्रेक्षक आपल्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघातील कोबेच्या नावाने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर अर्थात एमव्हीपी हा जयघोष करत होते. मायकेल जॉर्डन, मॅजिक जॉन्सन या बास्केटबॉल दिग्गजांनंतर प्रेक्षकांचे सर्वात जास्त प्रेम कुणा बास्केटबॉल खेळाडूलाच मिळाले असेल तर तो आहे कोबे ब्रायंट. कोबेने जरी आयुष्य लेकर्स संघासाठी घालवले तरी तो मूळचा फिलाडेल्फियाचा होता आणि फिलाडेल्फिया त्याच्या रक्तात शिल्लक होती असे म्हणतात. तो ज्या शाळेत शिकला त्या शाळेच्या कोबेच्या निधनानंतर झालेल्या सामन्यात कोबेचा शाळेतील जर्सी जी 33 क्रमांकाची होती, त्याची आठवण म्हणून कोर्टवरचे घडय़ाळ 33 सेकंदांवर थांबवले आणि त्याची शून्यापर्यंत उलटी गिनती करत अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. कोबे आपल्या हातातील जादू आपल्या लाडक्या मुलगी जियानात बघत होता, पण नियतीला ते मंजूर नव्हते. कोबे म्हणजे अचूकता हे समीकरण इतके घट्ट बसले आहे की, जणू काही अचूकतेला ‘कोबे’ हा समानार्थी शब्द झाला आहे.

आज आठवडा झाला तरी ग्रॅमी अवॉर्डपासून अनेक छोटय़ा मोठय़ा सोहळ्यात कोबेची आठवण निघाल्याशिवाय राहत नाही. अपघाताच्या आधी दोन तास कोबे आपल्या कुटुंबासह त्याच्या नेहमीच्या न्यूपोर्ट बीचमधल्या चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेसाठी गेला होता. ही त्याची भेट प्रार्थनेसाठी होती की देवाला अचूकतेने डाव कसा साधायचा याची शिकवण द्यायला होती हे आता कळणे नाही, पण वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी हा बास्केटबॉलचा जादूगार आपल्याला कायमचा चटका लावून सोडून गेला हे सत्य पचवणे समस्त क्रीडा जगातला अजून जमत नाही.

[email protected]