कोहलीची गरुडझेप ; एकदिवसीय क्रमवारीत दुसरे स्थान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीने दुसरे स्थान मिळवत अव्वल पदाच्या दिशेने निर्णायक झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 302 धावांची दमदार कामगिरी केल्यामुळे कोहलीला ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळाला असून तो सध्या अव्वल रोहित शर्माच्या केवळ आठ गुण मागे आहे. रोहितने मालिकेत 146 धावा करत आपले अग्रस्थान कायम राखले. शुभमन गिल पाचव्या स्थानावर कायम असून लोकेश राहुल बाराव्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत कुलदीप यादव तिसऱया स्थानावर झेपावला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 प्रकारात अक्षर पटेल, अर्शदीप सिंग व जसप्रीत बुमरा यांनी क्रमवारीत प्रगती केली आहे, तर कसोटी प्रकारात बुमरा अव्वल स्थानावर कायम आहे. यशस्वी जैसवाल हा सध्या क्रमवारीतील सर्वोच्च हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे.