
विराट कोहली अजूनही हिंदुस्थानी संघातील सर्वात फिट आणि आक्रमक खेळाडू आहे, जो अजूनही तीन-चार वर्षे कसोटी खेळू शकला असता, अशी भावना अवघं जग व्यक्त करत असलं तरी विराटने कसोटी क्रिकेटमधली आपली बॅट म्यान केलीय. टी-20, कसोटीनंतर तो वर्षभरात वन डेतूनही निवृत्त होईल असे अंदाज बांधले जात असताना त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी, विराट कोहली हा 2027च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत खेळणारच आणि हिंदुस्थानला वन डे वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद जिंकून देण्यासाठीही प्रतिबद्ध असेल, असा विश्वास व्यक्त केलाय.
विराट कोहलीच्या कसोटीतून निवृत्तीचा निर्णय ऐकून शर्मांनाही धक्का बसला. विराटचा खेळ आणि फिटनेस पाहता तो अजून 3 वर्षे सहज खेळला असता. रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी विराटने आपली निवृत्ती जाहीर करून हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण केली आहे. विराटच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्याच्या कारकीर्दीला माझा मानाचा मुजरा! त्याने भावी पिढीसाठी एक अनोखा आदर्श ठेवला आहे. पांढऱया जर्सीत त्याला पुन्हा पाहता येणार नाही याचे दुःख आहेच; पण काहीही झाले तरी 2027च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱया वन डे वर्ल्ड कपमध्ये तो खेळणारच. विराटचा निवृत्तीचा निर्णय दुःखद आहेच, पण त्याच्या वैयक्तिक निर्णयाचा मी आदर करतो. मला पूर्ण विश्वास आहे की, 2027च्या वर्ल्ड कपसाठी तो आतापासून हिंदुस्थानी संघाला जगज्जेता करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करेल, अशी भावना शर्मा यांनी बोलून दाखवली.
बीसीसीआय विराटच्या पाठीशी राहील?
विराट कोहलीने निवृत्ती घेऊ नये यासाठी बीसीसीआयने प्रयत्न केले होते, मात्र तो ऐकला नाही. त्याने भावी पिढीसाठी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मात्र या निर्णयानंतर विराटला बीसीसीआयचा किती पाठिंबा राहील हे खुद्द बीसीसीआयच सांगू शकेल. जर हिंदुस्थानने वन डे वर्ल्ड कप जिंकावा अशी बीसीसीआयची इच्छा असेल तर ते विराटच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि त्याला दबावमुक्त खेळू देतील अशी अपेक्षा आहे.
फक्त अडीच वर्षेच बाकी
आगामी वर्ल्ड कप 2027 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळला जाणार आहे. त्याला फक्त आता 29 महिने म्हणजे अडीच वर्षे उरली आहेत. कसोटीतून निवृत्त होताना विराटने वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचेच ध्येय डोळय़ासमोर ठेवल्याचे बोलले जातेय. त्याचा फिटनेस आणि त्याचा अद्भुत फॉर्म पाहता तो आपला पाचवा वर्ल्ड कप सहज खेळेल. त्याला कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यात अपयश आले असले तरी सचिन तेंडुलकरच्या वन डेतील 18426 धावांपासून तो केवळ 4245 धावा दूर आहे. तसेही त्याने वन डेतील सचिनच्या 49 शतकांचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे आणि त्याने आतापर्यंत 51 शतके ठोकली आहेत. जवळजवळ 58 धावांच्या सरासरीने खेळणारा विराट पुढील अडीच वर्षांत सचिनचा विक्रम मोडण्यात कितपत यशस्वी होतोय याबाबत साशंकता आहे. कारण इतक्या धावा करण्यासाठी त्याला किमान 70 ते 80 वनडे खेळाव्या लागतील. पुढील अडीच वर्षांत इतक्या वनडे होणे जरा कठीणच आहे.