कोकणच्या बहारदार जाखडीचे सूर घुमण्याची यावर्षी प्रतीक्षाच! कलाकारांचा सरावही थंडावला 

485

गणेशोत्सव आणि कोकण यांचं नातं काहिसं आगळं वेगळं आहे. याप्रमाणे होळीमध्ये ग्रामदेवतेच्या दर्शनाला मूळ कोकणकर आपल्या गावी येण्यासाठी धडपड करतात,त्यापेक्षा अधिक ओढीने नोकरी-व्यवसायानिमित्त दूरवर असणारी ही मंडळी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होतात. गणेशोत्सवा दरम्यान कोकणात जसा भक्तीचा मेळा भरतो, तसाच लोककलांनाही मानाचं स्थान मिळतं. कोकणच्या या लोककला एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरीत करण्याचं कार्य अविरतपणे सुरु असून टप्याटप्यानं यामध्ये झालेले बदल अभिनंदनीयच म्हटले पाहिजेत. जाखडी ही लोककला,यातील बहारदार नृत्याबरोबरच सुंदर रचना आणि चालीच्या नृत्यातून समाज प्रबोधनाचं महत्वपूर्ण काम करतेय. यावर्षी मात्र कोरोनामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येण्याची शक्यता नसल्याने आणि सार्वजनिक ठिकाणी जाखडीचे कार्यक्रम होणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले असल्याने यावर्षी गणेशोत्सवात जाखडीचे सुर घुमण्याची शक्यता मावळली आहे.

आठ, दहा किंवा बारा अशा समसंख्येत 15 ते 22 या वयोगटातील युवक भरजरी कपडे परिधान करुन ढोलकीच्या तालावर तसेच शाहिराच्या खडया आवाजातील गाण्यावर वेगानं गोल फिरत नृत्यं करतात या पुरातन लोककलेला जाखडीनृत्य असं म्हटलं जातं. जाखडी नृत्याचा प्रारंभ हा गणेशोत्सवामध्येच होतो. गणेशोत्सव आणि जाखडीनृत्य यांच परंपरागत नातं जोडलं गेलं आहे.जाखडी नृत्यात शक्ति आणि तुरा असे दोन प्रकार असतात. एकाकडे शाहिरी कला उत्तम असते, तर दुसऱ्याकडे वाजप आणि रंगबाजीला तोड नसते. शक्ती विरुध्द तुरा असे जाखडी नृत्याच्या स्पर्धेचे कार्यक्रम गणेशोत्सवा दरम्यान कोकणात सर्वत्र सुरू असतात.

शाहीर आणि ढोलकी वाजविणारे चार कलाकार मध्यभागी बसतात आणि त्याभेावती उत्तमोत्तम वेशभुषा केलेले जाखडी नृत्य कलाकार विविध प्रकारे नृत्य करतात. जाखडी नृत्याची सुरुवात ग्रामदेवता आणि गुरु यांच्या स्तवनाने होते. शाहिर आपली ओळखही गीता मधूनच करुन देतो. दहा मिनीटांची प्रार्थना झाल्यानंतर ढोलकी वाजविणारे कलाकार ढोलकीवर अशी काही थाप मारतात, की ढोलकीच्या या आवाजाने भोवती उभ्या असणा-या युवकांच्या अंगातही नृत्य आपोआप संचारते आणि त्यांचे पाय सहजपणे थिरकू लागतात. जवळपास पंधरा ते वीस मिनीटे एका बाजूला ढोलकीचा कडकडाट सुरु असतो आणि दुस-या बाजूला तेवढयाच वेगाने कलाकार, बहारदार नृत्य करत पहिल्याच ठेक्यात उपस्थितांची मनं जिंकतात. ढोलकीच्या या आवाजाने केवळ कलाकारांच्या अंगातच नृत्य संचारते असं नव्हे, तर उपस्थित रसिकही मत्रमुग्ध होऊन जातात.

जाखडी म्हणजे, ढोलकीचा कडकडाट, रंगबाजी आणि गायकीची स्पर्धा. याबरोबरच नृत्य आणि गीतां दरम्यान होणारे सवाल-जवाब. एका संघाने गीतामधून विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तरं दुस-या संघाने दयायचं आणि त्या संघाला प्रश्‍न विचारुन ठेवायचा. सवाल-जवाबाचा हा कार्यक्रम उत्तररात्रीपर्यंत रंगत जातो. विशेष म्हणजे हे सवाल-जवाब रामायण,महाभारत आणि पुराणावर आधारीत असल्याने शाहिरांना वाचनाने चौकस असावे लागते. वर्षभरात घडणा-या राष्ट्रीय आपत्तीच्या, अपघातांच्या घटना, शासनातर्फे राबविली जाणारी विविध अभियानं यावर आधारीत जाखडी नृत्यातील गीतांच्या रचना असल्याने, हे नृत्य म्हणजे समाज प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम ठरत आहे. रत्नागिरी जिल्हयातील पोलीस दलाने किनारपटटी सुरक्षेच्या जागृतीसाठी जाखडी नृत्य कलेचा यथायोग्य उपयोग करुन जाखडीनृत्य हे समाजप्रबोधनासाठी उपयुक्त असल्याचे दाखवून दिले आहे.

यावर्षी मात्र कोरोनामुळे लावणी हंगामानंतर जाखडी नृत्य कलाकारांचा सुरु होणारा सराव यावर्षी प्रथमच थंडावला आहे. गणेशोत्सवात जाखडी नृत्य नाही, असं आजवर गेल्या 100 वर्षात कधीही झाले नाही. यावर्षी मात्र ढोलकी आणि चाळ यांचे सुर ऐकायला मिळणे अशक्य आहे. जाखडीचा सराव करणारे कलाकार लावणी हंगामानंतर सध्या अस्वस्थ झाले असल्याने अन्य कामात असतांना केवळ तोंडाने जाखडीतील गीते म्हणून स्वतःचे समाधान करुन घेत आहेत. जाखडीवर अवलंबून असणारे ढोलकी तयार करणाऱ्या कलाकारांच्या हातांनाही यावर्षी काम मिळणे अवघड होवून बसले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवा पूर्वी जाखडी आणि भजनासाठी ढोलकी, मृदंग आणि तबला नव्याने भरण्याचे काम सुरु होते, यावर्षी मात्र हे कारागीर हातांना काम नसल्याने निराश आणि हताश झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या