कोकणात लावणीच्या कामाला वेग; कोरोनाची भिती खुंटीला अडकवून शेतकरी लावणीत गुंतले

390

गेले काही दिवस लावणीला आवश्यक असाच पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी लावणी उरकण्याला प्राध्यान्य दिले आहे. कोरोनाची भिती बाजूला सारून शेतकरी शेतात दिवसभर लावणी करताना दिसत आहेत. यावर्षी कोरोनामुळे चाकरमानीही गावी आलेले असल्याने शेतकऱ्यांना लावणीच्या चाकरमान्यांची मदत होवू लागली आहे.

कोकणातील शेती हीपुर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. पाऊस चांगला झाला तर शेतकऱ्याला वर्षभर केलेल्या काबाडकष्टाचे फळ मिळते नाहीतर शेतीसाठी वर्षभर केलेला खर्चही निघत नाही. पावसाच्या लहरीपणाला कंटाळलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेती करण्याचे सोडून दिले आहे. मात्र वडिलोपार्जित शेती ओसाड रहावू नये यासाठी काही शेतकरी पावसाच्या लहरीपणाला तोड देत आजही शेती करत आहेत. मात्र शेतीच्या मशागतीसाठी आता पारंपारिक अवजारांचा वापर न करता आधुनिक अवजारांचा वापर करू लागले आहेत. पुर्वी कोकणातील शेतीच्या मशागतीसाठी नांगर वापरला जात असे. यासाठी शेतकऱ्याकडे दोन उमदे बैल असावे लागत. मात्र आता बैलांच्या नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातून आता बैलांचा हाकारा येईनासा झाला आहे.

गेले काही दिवस कोकणात लावणीसाठी आवश्यक असाच पाऊस पडत आहे. परंतू पावसाच्या लहरीपणाचा भरवसा नसल्याने शेतकऱ्यांनी लावणी उरकण्याच्या कामावर जोर दिला आहे. अलिकडे बैलांच्या नांगराऐवजी पॉवर टिलर वापरला जात असल्याने लावणीची काम कमी वेळेत उरकत असल्याने कमी वेळेत शेतीची कामे उरकणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. यावर्षी जगभर कोरोनाने थैमान घातले असल्याने शेतक-यांच्या डोक्यावरही कोरोनाचे ढग जमा झाले आहेत. मात्र शेतकरी कोरोनाच्या भितीला खुंटीला अडकून शेतात राबताना दिसत आहेत कोरोनामुळे मुंबई, पुणे येथील चाकरमानीही आपल्या मुळगावी आलेले आहेत. त्यामुळे लावणीसाठी चाकरमान्यांचीही मदत होऊ लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या