कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची दरडींनी केली नाकाबंदी

522
प्रातिनिधिक छायाचित्र

महाडनजीक कुर्ला धरणाजवळ दरड कोसळल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच पोलादपूरजवळील धामणदेवी गावाच्या हद्दीत कशेडी घाटात अख्खा डोंगर रस्त्यावर अवतरला आहे. मातीच्या ढिगाऱ्यांसह भलीमोठी दरड कोसळल्यामुळे गुरुवारी रात्रीपासून ठप्प पडलेला मुंबई-गोवा महामार्ग शुक्रवारी सायंकाळी पूर्ववत झाला. आधी आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे वाहतूक बंद झाली. त्यानंतर कुर्ला घाटात दोन वेळा दरड कोसळल्याने वाहतूक वळविण्यात आली आणि आता कशेडी घाटात दरडींचा धोका वाढल्यामुळे कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची नाकाबंदी झाली आहे.

पोलादपूरजवळील धामणदेवी गावाच्या हद्दीत गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास कशेडी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, महामार्ग प्रशासन, एल. ऍण्ड टी. कंपनीची टीम आणि पोलादपूरचे नायब तहसीलदार समीर देसाई हे आपत्कालीन यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग प्रशासनाने एल. ऍण्ड टी. कंपनीच्या मदतीने जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने महामार्गावरील दरड हटविण्याचे काम रात्री नऊपासून युद्धपातळीवर सुरू केले. मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा याच ठिकाणी डोंगरातून दगड-मातीचा राडारोडा महामार्गावर आला. त्यामुळे प्रशासनाची आणखीनच डोकेदुखी वाढून दरड हटविण्याचे काम आणखीन 16 तासांनी वाढले.

महामार्ग बंद झाल्याने कोकणातून मुंबईकडे जाणाऱया वाहनांची वाहतूक खेड तालुका प्रशासनाने नातूनगर, किन्हेरे, महाडमार्गे वळवली, परंतु लॉकडाऊनच्या काळात किन्हेरे-नातूनगर रस्त्यावर खेड प्रशासनाने मोठा चर खोदून रस्ता बंद केला आहे.
म्हाप्रळमार्गे मुंबईला जाण्यासाठी एकमेव अस्तित्वात असलेल्या आंबेत पुलाची डागडुजी सुरू असून गेल्या आठ महिन्यांपासून या रस्त्यावरून अवजड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या वर्षी कशेडी घाटात दरडी कोसळण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. यंदाही त्याची मालिका सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांत एकाच ठिकाणी दोन वेळा दरड कोसळल्याने मुंबई-गोका महामार्ग ठप्प पडला.

शेतीचा चिखल झाला
कशेडी घाटातील रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा उपसत असतानाच शुक्रवारी परत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मातीचा चिखल आजूबाजूच्या शेतांमध्ये पसरून पिकांचे नुकसान झाले.

आपली प्रतिक्रिया द्या