Kokan News – दापोलीत पसरली दाट धुक्याची दुलई नागरिक सुखावले; वाहनचालक मात्र त्रस्त

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीवर शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी दाट धुक्याची दुलई पसरल्याने वाहनचालकांना यातून मार्ग काढणे कठीण होत होते. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विजय मैदानावर खेळाचा सराव करण्यासाठी सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना सगळीकडेच पसरलेल्या दाट धुक्याच्या दुलईचा सामना करतच खेळाचा सराव करावा लागला अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे सर्वजण चांगलेच सुखावले.

कधी अवकाळी पावसाचा शिडकावा, कधी कडक उष्णतेचा कडाका तर कधी हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा गारठा असे बदलते वातावरण दापोलीत सुरू असून मागील ४ दिवस कडक उष्म्याच्या काहीलीने अंगाची लाही लाही झाली असताना त्यातच पावसाला सुरुवात तर शनिवारी सकाळी दापोलीत सगळीकडेच दाट धुक्याची दुलई पसरल्याचे मनमोहक चित्र पाहायला मिळाले. या धुक्याच्या दुलईने मात्र वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. यामुळे मागील चार दिवसाच्या उष्म्याच्या काहीलीने हैराण झालेल्या दापोलीकरांना सकाळ सकाळीच गारव्याचा सुखद धक्का मिळाला.

असे असले तरी धुक्याच्या गारव्याने डांबरी रस्ते पुर्णपणे ओलेचिंब होत निसरडे झाले होते. तर पसरलेल्या दाट धुक्यामुळे वाहनचालकांना आपल्या ताब्यातील वाहनांना मार्ग काढतांना वाहनांचे दिवे लावूनसुध्दा तसे कठीणच होत होते. दाट धुक्याची दुलई पसरल्याने अनेक ठिकाणचे मार्ग धुक्यात हरवून गेले होते. त्यातच सुर्योदयाची धुक्यावर पडणारी किरणे याचे मनोहारी दृष्य पाहावयास मिळत होते. अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात नयनरम्य दृष्य टिपली. असे शनिवारी दापोलीत वातारवण होते.

ही दाट धुक्याची दुलई केवळ शहरापुरती पसरली नव्हती तर खेडोपाडी सुध्दा असेच सगळीकडे वातावरण होते. त्यामुळे दररोजचा शेतीकामासाठी बाहेर पडण्याचा शेतकऱ्यांचा तसेच गुरे चरण्यास नेण्यासाठीचा गुराख्यांचा दिनक्रम बदलला होता अशाप्रकारची दाट दुलई पसरली होती.