Kokan News – मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी शहरातील रामआळी येथे एका बँकेच्या एटीएम भागात झोपलेल्या प्रौढाला बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टिलच्या पाईपने जीवघेणा हल्ला केला. शहर पोलिसांनी संशयितास अटक केली. न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्वप्निल सुनिल पाटील (वय ४२, रा. वायंगणी, रत्नागिरी) असे संशयित सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.४) सकाळी आठच्या सुमारास रामआळी येथील जनाता सहकारी बॅंकेच्या एटीएमजवळील मोकळ्या भागात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश नारायण भारती (वय ५०, रा. तोणदे, रत्नागिरी) हे एटीएमच्या मोकळ्या जागेत झोपलेले असताना संशयितांने त्यांना उठवून तू इथून निघून जा, असे सांगितले असता फिर्यादी यांनी तू मला सांगणारा कोण? असे विचारले असता त्याचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादी मंगेश यांना शिवीगाळी करून हाताच्या थापटाने मारहाण करून स्टीलचा पाईप डोक्यात मारून दुखापत केली. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेशला पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी मंगेश भारती यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. संशयितास सोमवारी न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.