
कोकण रेल्वेवर सप्टेंबरमध्ये विजेवर चालणारी प्रवासी गाडी सुरू झाली आणि कोकणात जाणाऱया प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र दोनच महिन्यांनी शुक्रवार, 25 सप्टेंबरच्या पहाटे दिवाणखवटी ते विन्हेरे रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड एक्युपमेंट वायर तुटली आणि कोकण रेल्वे तब्बल दोन तास ठप्प झाली. त्याचा परिणाम कोकणकन्या एक्स्प्रेसवर सर्वाधिक झाला. ती तब्बल 3 तास 30 मिनिटे उशिराने धावली. दरम्यान, तुटलेली ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आल्यानंतर पाच तासांनी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी डिझेल इंजिन मागवण्यात आले.
या गाडय़ांना झाला विलंब!
ओव्हरहेड एक्युपमेंट वायर तुटल्यामुळे त्रिवेंद्रम एक्स्प्रेस 4 तास 24 मिनिटे, कोकणकन्या एक्स्प्रेस 3 तास 30 मिनिटे उशिराने धावत होत्या. कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी वीर स्थानकात थांबवली होती. तुतारी एक्स्प्रेस 3 तास करंजाडी स्थानकात थांबवली होती. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस साडेतीन तासांहून अधिक वेळ सापेवामने स्थानकात थांबवण्यात आली तर सीएसटीएम-मंगलोर एक्स्प्रेस साडेपाच तास दिवाणखवटी स्थानकात थांबवली होती. मत्स्यगंधा एक्स्प्रेस साडेचार तासांपासून सापेवामणे स्थानकात थांबवण्यात आली होती.