
पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या पत्रानंतर जिह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱया शहरी 93 व ग्रामीण 8 अशा एकूण 101 विद्यार्थ्यांना आज महापालिकेच्या वतीने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, यासाठी त्यांना प्राधान्याने लसीकरण देण्यासंदर्भात पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्र दिले होते. याची दखल घेत अशा विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले होते. याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी भेट देऊन माहिती घेतली.























































