
भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता, उजळाईवाडी येथील विमानतळाची धावपट्टी 3 हजार मीटरपर्यंत वाढवणार असून, एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळासह विविध प्रश्नांवर बैठक झाली. यावेळी केंद्रीय कर्मचाऱयांच्या मुलांसाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय विद्यालयाचे काम येत्या वर्षभरात मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापुरात केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांच्या मुलांसाठी केंद्रीय विद्यालय व्हावे म्हणून आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. सध्या केवळ पुणे आणि बेळगाव येथेच केंद्रीय विद्यालय आहे. कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय होण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, शासनाने त्याला मान्यता दिली आहे. त्यादृष्टीने कोल्हापुरात दोन ठिकाणच्या जागा प्रशासनाने सुचवल्या आहेत. केंद्रीय समितीने जागेची पाहणी करून त्याला मान्यता दिल्यानंतर हा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावरून 15 मेपासून हवाई सेवेचा विस्तार होत आहे. लवकरच हैदराबाद आणि बंगळुरू या दोन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे. चालू वर्ष अखेरपर्यंत आणखी काही प्रमुख शहरे कोल्हापुरातून हवाई सेवेने जोडली जातील. त्यामुळे भविष्यातील हवाई सेवेची वाढती व्याप्ती लक्षात घेता, विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. सध्या विमानतळाची असणारी धावपट्टी 2 हजार 300 मीटरवरून 3 हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येईल. तसेच एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कोल्हापुरी चपलेला जागतिक बाजारपेठेसाठी क्लस्टर योजना
कोल्हापूरची खासियत असलेल्या कोल्हापुरी चपलेला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्लस्टर योजनाही अंमलात येत आहे. पेंद्र सरकारने चर्म उद्योगवाढीसाठी 100 कोटी रुपयांची मेगा क्लस्टर योजना जाहीर केली आहे.