कोल्हापूरच्या पठ्ठ्याला वेध हिंदुस्थानी संघाचे

389

17 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया कोल्हापूरच्या अनिकेत जाधव या 21 वर्षीय खेळाडूला आता हिंदुस्थानच्या सीनियर फुटबॉल संघातून खेळण्याचा ध्यास लागून राहिलाय. यावेळी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने लॉकडाऊनमध्ये फिटनेससाठी केलेली मेहनत, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार, सुनील छेत्रीकडून घेतलेली प्रेरणा, ब्लॅकबर्न रोवर्स या क्लबकडून घेतलेला मोलाचा अनुभव अन् कुटुंबाची स्टोरी या महत्त्वाच्या बाबींवर दिलखुलास मते व्यक्त केली.

रोनाल्डो, नेयमार माझी प्रेरणा

पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो व ब्राझिलचा स्टार नेयमार या दोन फुटबॉलपटूंकडून मला प्रेरणा मिळत असते. दोन्ही खेळाडूंचे स्किल, स्पीडवर्क आणि एकंदर त्यांचा खेळ मला माझ्या खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. लियोनेल मेस्सी हा बहुतांशी डाव्या पायाने खेळतो. त्यामुळे लियोनेल मेस्सीपेक्षा ख्रिस्तियानो रोनाल्डो व नेयमार यांचा खेळ जास्त ‘फॉलो’ करतो. तसेच हिंदुस्थानच्या सुनील छेत्रीकडूनही खूप काही शिकता आले आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत इतर युवा खेळाडूंसमोर आदर्श निर्माण केलाय. त्याचे खेळावर असलेले प्रेम, शिस्त ही लाजवाब आहे. बंगळुरूसाठी खेळताना कर्णधार म्हणून त्याने बांधलेला संघही कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत अनिकेत जाधव याने स्टार खेळाडूंचे कौतुक केले.

वडिलांमुळे फुटबॉलकडे वळलो

कोल्हापूर हे फुटबॉल ‘हब’ म्हणून ओळखले जाते. इयत्ता तिसरीमध्ये शिकत असताना वडिलांनी कोल्हापूरच्या फुटबॉल स्टेडियममध्ये लढत पाहण्यासाठी नेले. तेथे उपस्थित असलेल्या फुटबॉलप्रेमींची गर्दी, खेळाबाबतची क्रेझ व वेगवान फुटबॉल हे सर्व पाहून त्या खेळाच्या प्रेमात पडलो. तिथपासून फुटबॉल खेळतोय. वडील ड्रायव्हर आहेत. आता फुटबॉलच्या जोरावर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलायची आहे, असा विश्वास अनिकेत जाधव याने यावेळी व्यक्त केला.

ब्लॅकबर्न रोवर्स क्लबमधून मोलाचा अनुभव मिळवला

गेल्या वर्षी इंग्लंडमधील ब्लॅकबर्न रोवर्स या क्लबसाठी माझी निवड करण्यात आली. या तीन महिन्यांमध्ये मला एकाही लढतीत खेळण्याची संधी मिळाली नाही, पण सराव करायला मिळाला. हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामधील फरक मला यावेळी प्रकर्षाने दिसून आला. या कालावधीत माझ्या खेळामध्ये सुधारणा झाली. शारीरिकदृष्टय़ा आणखी सक्षम बनलो. हेल्थी जेवण खायला मिळाले. हा अनुभव मोलाचा होता, असे अनिकेत जाधव याने यावेळी आवर्जून नमूद केले.

ट्रेनरसोबत सराव

लॉकडाऊनमध्ये मी सूरज चौगुले या ट्रेनरसोबत कसून सराव केला. सुरुवातीला साधा सराव करीत होतो. त्यानंतर रनिंग, वेट ट्रेनिंग, कार्डियो यांसारख्या बाबींवर लक्ष दिले. गेल्या काही दिवसांमध्ये मैदानात जाऊन फुटबॉलचा सराव करू लागलो आहे. या सरावातही सूरज चौगुले यांच्याकडून मला टिप्स दिल्या जात आहेत, असे अनिकेत जाधव सांगतो.

नोव्हेंबरमध्ये आयएसएलला सुरुवात होणार

गेल्या मोसमात पहिल्यांदाच आयएसएलमध्ये खेळलो. जमशेदपूर या संघामधून खेळताना प्रचंड मजा आली. कुटुंबालाही आर्थिक हातभार लागला. आता आगामी मोसमासाठीही मी सज्ज झालोय. येत्या नोव्हेंबरपासून आयएसएलच्या आगामी मोसमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तसेच सप्टेंबर महिन्यापासून सरावाला सुरुवातही होऊ शकते, असे अनिकेत जाधवने पुढे म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या