
गेल्या दोन दिवसांत तीन करोनाबाधीत आढळल्याने जिल्ह्यात धाकधुक वाढली असतानाच, आज कोल्हापूरांसाठी एक दिलासा देणारा वैद्यकीय अहवाल आला आहे. रुग्णवाहिकेतून आलेल्या कसबा बावडा, मराठा काॅलनी येथील ‘त्या’ कोरोना बाधित वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला.
आज सकाळी एकूण 41 जणांच्या स्वॅबचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. सातारा येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेली ही 63 वर्षीय महिला कडक संचारबंदी असतानाही दि.28 मार्च रोजी एका रुग्णवाहिकेतून बेकायदेशीर प्रवास करून कोल्हापूरात कसबा बावडा येथील मराठा काॅलनीत दाखल झाली होती. त्यानंतर श्र्वसनाचा त्रास होऊ लागल्याने,परिसरातील खासगी तसेच सरकारी दवाखान्यात तिच्यावर उपचार करण्यात आले. अखेर तिच्या प्रवासाची माहिती मिळाल्यानंतर केलेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव अहवाल आल्याने संपूर्ण भाग सील करण्यात आला होता. तर बेकायदेशीर प्रवास वाहतूक केल्याप्रकरणी संबंधित रुग्णवाहिका चालक आणि मालक यांच्यावर जिल्हा प्रशासनाकडून गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला.
मुंबईहून-कर्नाटकात कंटेनर मधून बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या तीस जणांना किणी टोल नाका येथे ताब्यात घेऊन,छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांत यामधील एक पुरुष आणि एक महिला यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव आले.त्यात इचलकरंजी येथील एका वृद्धाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव आल्याने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दहावर पोहोचली.यातील भक्तीपुुुजानगर येथील बहिण-भाऊ,पेठवडगाव येथील युवती असे तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
























































