
चाहत्यांच्या हौसेला मोल नसते. पण हौसेचा अतिरेक झाल्यास काय होऊ शकते याचा प्रत्यय कोल्हापुरात पाहायला मिळाला. कोल्हापूर हा जिल्हा कुस्तीच्या दंगलीसाठी ओळखला जातो. मात्र येथे यावेळी भलतीच दंगल पाहायला मिळाली आणि तिची दखल चक्क वीरेंद्र सेहवागनेही घेतली. हिंदुस्थान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचे फॅन कुरुंदवाड येथे भिडले. ऊसाच्या शेतात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. आयपीएलपूर्वीच फॅन्सच्या ‘वॉर’ ची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या कारकिर्दीला सलाम करणारी पोस्टर्स कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी फॅन्सने लावली आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथेही धोनीची पोस्टर्स झळकली .दोन दिवसांपूर्वी रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि पोस्टर वॉर सुरु झाले. रोहितच्या चाहत्यांनी त्याचे पोस्टर्स कुरुंदवाडमध्ये लावली. धोनी भारी की रोहित अशी चर्चा सुरु झाली.काही अज्ञात लोकांनी पोस्टर फाडले काहींनी ब्लेड मारली. यावरून दोन गट पडले. बाचाबाची, शिवीगाळ झाली. प्रकरण एवढे हाताबाहेर गेले की शिवीगाळ करणाऱ्या चाहत्याला दुसऱ्या गटाच्या चाहत्यांनी त्याला ऊसाच्या शेतात नेऊन मारहाण करण्यात आली. चाहत्यांच्या या ‘वॉर’ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अद्याप कोणीही पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही.
वेड्यासारखं काय करताय : सेहवाग
कुरुंदवाडच्या ‘वॉर’ची चर्चा आजी-माजी क्रिकेट खेळाडूंमध्येही सुरु आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विट करून फॅन्सला फटकारले आहे. हिंदुस्थानचा संघ एक आहे. मैदानावर खेळाडू एकत्र खेळतात. मैदानावर एकत्र असतात. काही खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांशी बोलतही नाहीत. ते फक्त आपल्या कामाशी काम ठेवता. पण हे चाहते वेडे आहेत? असा वेडेपणा का करता? मारामारी करू नका असे सेहवागने म्हटले आहे.
कुरुंदवाडकर आणि पोलीस काय म्हणतात…
कुरुंदवाड शहरातील धोनी व रोहितच्या पॅâन्सनी ‘हम सब एक है’चा नारा दिला आहे. तर दुसरीकडे उपविभागीय पोलीस अधिकाNयांनीही खास प्रेस नोट काढून भांडणे झालीच नसल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या पोस्टरवरून वाद झाल्याचे सांगण्यात येते ते पोस्टर नगरपालिका प्रशासनाने तातडीने काढून टाकल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.























































