शिवसेना बँक घेऊन आली दारी, पेन्शनधारक लाभार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

974

संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या विविध योजनांतुन मिळणारी आर्थिक मदत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून थांबल्याने चिंतेतील लाभार्थ्यांसाठी करवीर शिवसेनेने आधार दिला. बँकेलाच गावात आणुन दीडशेहुन अधिक वृद्ध व गोरगरीब लाभार्थ्यांना योजनांचा निधी मिळवुन दिला. सुमारे साडेपाच लाखाहून अधिक रक्कम वितरीत करण्यात आली. यावेळी आनंदाश्रुने लाभार्थ्यांनी शिवसेनेची कृतज्ञता व्यक्त केली.

संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या विविध योजनेतील उचगांव,ता. करवीर येथील लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड येथील शाखेेेतुन पेन्शन दिली जाते. बँकेत जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने एक तर पायी चालत जावे लागते. तर रिक्षासाठी प्रत्येकी 100 ते 200 रुपये खर्च करावा लागतो. शिवाय सकाळी पेन्शन आणण्यासाठी गेलेला लाभार्थी संध्याकाळीच घरी जातो. त्यात सध्या कोरोना महामारी आणि लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून थकलेली रक्कम घेण्यासाठी बँकेत होणारी प्रचंड गर्दी टाळण्यासाठी तसेच संबंधित लाभार्थ्यांना गावातच हि रक्कम मिळावी यासाठी करवीर तालुका प्रमुख राजु यादव यांनी पुढाकार घेतला. लाभार्थ्यांची संबंधित योजनेची दिडशेहुन अधिक पुस्तके बँक प्रशासनाला देऊन, गावातच या निधी वाटपाचे नियोजन केले.

त्यानुसार आज उचगाव येथील मंगेश्वर मंदिरात बँकेचे मॅनेजर सुभाष पाटील यांच्याकडून ऐनवेळी आलेल्यांसह दिडशेहुन अधिक लाभार्थ्यांना सुरक्षित अंतर ठेवून हा निधी वाटप करण्यात आला. याद्वारे साडे पाच लाखाहुन अधिक निधीचे वाटप करण्यात आल्याचे करवीर तालुका प्रमुख राजु यादव यांनी सांगितले. यावेळी विक्रम चौगुले, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, विनायक जाधव, सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश खांडेकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या