
दिवाळी आणि मातीचे किल्ले हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. याच कारणामुळे लालबाग येथील मेघवाडीमधील सी ब्लॉक, दुसरा मजला येथील लहान मुले आणि तरुणांचा ‘डंकिन ग्रुप’ सध्या चर्चेत आलाय. डंकिन ग्रुपने यंदाच्या दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्यातील ‘रांगणा’ किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत.
मुलांमध्ये गडकिल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दीपावलीनिमित्त दरवर्षी एका किल्ल्याची संकल्पना घेऊन ‘डंकिन ग्रुप’तर्फे किल्ला साकारण्यात येतो. या ग्रुपने यंदा गणपती बनविण्यासाठी वापरली जाणारी माती, कागद आणि नैसर्गिक रंग वापरून हा संपूर्ण ‘रांगणा’ किल्ला बनवला आहे. किल्ला साकारण्यासाठी राहुल मोरवेकर, शितल मोरवेकर, अक्षय शिरसेकर, स्नेहल धुरी, रश्मी धुरी, कुणाल आंगणे, कोमल आंगणे, अल्पा हळदणकर, शंतनु चाळके, चिन्मय सावंत , सोहम सावंत, श्रावणी चाळके, स्वानंदी घारकर, श्रीवत्स तुळसकर, कैवल्य मोरवेकर, मृणालिनी घाडीगांवकर यांनी आपला अभ्यास आणि नोकरी सांभाळून अहोरात्र मेहनत घेतली आहे.
‘रांगणा’ किल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. या किल्ल्यासाठी शिवरायांनी 6000 होन खर्च केल्याचे समजते, अशी माहिती अक्षय शिरसेकर यांनी दिली. हा किल्ला येथील विभागातील आकर्षण असून अनेकजण तो पाहायला येतात, असे अक्षयने सांगितले.