कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

मतदानाच्या टक्केवारीत यंदाही राज्यात अव्वल राहिलेल्या जिह्यातील 386 ग्रामपंचायतींचे निकाल आज लागले. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या जिह्यातील एकूण 1 हजार 25 पैकी 433 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यातील 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 386 ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीने आणि इर्षेने शुक्रवारी राज्यात सर्वाधिक 83.80 टक्के मतदान झाले होते. बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, महाविकास आघाडीलाही यश आले आहे. सत्तांतरे झाल्याचे आणि सत्ता राखल्याचेही दिसून आले, तर स्थानिक आघाडय़ा व गटांचेही वर्चस्व ठळकपणे दिसून आले. जिह्यात एकंदरीत ग्रामपंचायत निवडणूक निकालात महाविकास आघाडीचेच प्रतिबिंब दिसून आले आहे. दरम्यान, विजयी मिरवणुकीला बंदी घालण्यात आल्याने, विजयी उमेदवारांनीही साधेपणानेच गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष केला.

गगनबावडय़ात तीन ग्रामपंचायतींत सत्तांतर

गगनबावडा तालुक्यात 5 ठिकाणी सत्ता कायम राहिली, तर 3 ग्रामपंचायतींत सत्तांतर झाले. येथे 6 ग्रामपंचायतींत काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील गटाने, तर भाजप आणि शिंदे गटाने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राखली आहे. गगनबावडा, कातळी-लखमापूर, वेतवडे, किरवे व लोंघे या ग्रामपंचायतीत सत्ता कायम राहिली असून, सांगशी-सैतवडे, असंडोली, मुटकेश्वर-खडूळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. उर्वरित 7 जागांसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशा दोन गटांत दुरंगी लढत झाली. वेतवडे ग्रामपंचायतीत शिंदे गट व पालकमंत्री सतेज पाटील गटाने समझोता करत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. यात 5 जागा बिनविरोध निवडून आल्या. मात्र, उर्वरित 2 जागांवर एकाच महिलेने अर्ज भरल्याने बिनविरोधला खो बसला.

करवीर तालुक्यात स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व

करवीर तालुक्यातील 54 पैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने, उर्वरित 49 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानात 88.23 टक्के मतदान झाले होते, तर आज मतमोजणीनंतर आलेल्या निकालांत 8 ग्रामपंचायतींत सत्तांतर झाले असून, 12 ग्रामपंचायतींत सत्तेची सूत्रे सत्ताधाऱयांकडेच कायम राहिली. तब्बल 27 ग्रामपंचायतींत स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व राहिले. पाडळी खुर्द आणि पाटेकरवाडी या दोन ग्रामपंचायती त्रिशंकू झाल्या आहेत.

हातकणंगले तालुक्यात दहा ग्रामपंचायतींत सत्तांतर

हातकणंगले तालुक्यात 20 पैकी 10 ग्रामपंचायतींत सत्तांतर होऊन 9 ग्रामपंचायतींत सत्ता कायम ठेवण्यात यश आले. तर, 1 ग्रामपंचायत त्रिशंकू राहिली. शिवसेनेने बिरदेववाडी, मिणचे, माणगाववाडी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली, तर महाविकास आघाडीला बहुतांश ठिकाणी यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. हातकणंगले तालुक्यातील 21 पैकी मौजे तासगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित 20 ग्रामपंचायतींच्या 229 जगांसाठी 582 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत होते. आजच्या निकालाने तालुक्यात शिवसेना, महाविकास आघाडीला यश दिले असले, तरी जनसुराज्य व आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीनेही पारंपरिक ग्रामपंचायतींवर सत्ता कायम ठेवली आहे.

कागल तालुक्यात महाविकास आघाडीची बाजी

कागल तालुक्यातील 48 पैकी 30 ग्रामपंचायती जिंकत महाविकास आघाडीने बाजी मारली. आठ ग्रामपंचायतींमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाला. पिंपळगाव बुद्रूक, बानगे, हळदवडे, करंजीवणे, म्हाकवे या पाच गावांत सत्तांतर झाले. पिंपळगाव बुद्रूक या ठिकाणी चाळीस वर्षांच्या समरजितसिंह घाटगे गटाच्या सत्तेला खिंडार पडले. या ठिकाणी महाआघाडीने मोठा विजय मिळवला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. तालुक्यातील 53 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. तालुक्यात प्रथमच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने अनेक गावांत एकत्रित निवडणुका लढवल्या. हसूर, पिंपळगाव बुद्रूक, भडगाव, करनूर, अर्जुनी, बेनिक्रे, खडकेवडा, मेतके, बोळाविवाडी, लिंगनूर कापशी, हळदवडे, बेलेवडी मासा, लिंगनूर दुमाला, गलगले, सोनाळी, बस्तवडे, कौलगे, करांजीवणे, शेंडूर, सुळकूड, चिखली, सिद्धनेर्ले, तमनाकवाडा, कासारी, बिद्री, केंबळी, व्हन्नूर, शंकरवाडी, केनवडे या गावांत महाविकास आघाडीने बाजी मारली. तर, हासूर खुर्द, भडगाव, मेतके, साके, गलगले, बोळावीवाडी, बस्तवडे, हळदी या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.

राधानगरी तालुक्यातील 19 पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, 17 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू होत़ी यामधील चार ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले, तर 13 ग्रामपंचायतीतील सत्तारूढ आघाडींना ग्रामपंचायतींमध्ये सत्ता राखण्यात यश आले. विजयी झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक आहे, शिवसेनेला कोनोली तर्फ असंडोली या ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे.

शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडी

शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या महाविकास आघाडीला 23 ठिकाणी सत्ता मिळवण्यात यश आले. शिरोळ तालुक्यात 53 पैकी 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. आज झालेल्या मतमोजणीत कुटवाड, हसूर, गौरवाड, गणेश वाडी, जैनापूर, दानोळी, तमदलगे, नांदणी, निमशिरगाव, कोंडिग्रे, नृसिंहवाडी, आलास, शिरदवाड, जुने दानवाड, मजरेवाडी, टाकळीवाडी, अर्जुनवाड, घालवाड, कवठेगुलंद, बुबनाळ, यड्राव व दत्तवाड येथे यड्रावकर समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत. तर, बस्तवाड, उदगाव, कोथळी, तेरवाड, शिरटी, चिपरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय झाला आहे. शिवाय धरणगुत्ती, जांभळी व शेडशाळ येथे काँग्रेसला यश मिळाले आहे.

आजरा तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व

आजरा आघाडीसह येथे स्वतंत्रपणे भगवा फडकविण्यात शिवसेनेला यश आले. अनेक गावांत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीने मिळून निवडणूक लढवत सत्तांतर केले. हात्तीवडेत शिवसेनेने सत्तांतर केले. कोवाडे येथे सत्ता राखली, तर सुळे गावात शिवसेनेचा प्रवेश झाला आहे. आजरा तालुक्यात 26 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आज मतमोजणी होऊन निकाल आल्यानंतर 21 पैकी 10 ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्याचे दिसून आले. यातील बहुतांश ग्रामपंचायतींत भाजप आघाडीची सत्ता होती. जाधेवाडी, चिमणे, मलिग्रे, कोवाडे, मुमेवाडी, चव्हाणवाडी, हालेवाडी, बेलेवाडी, देवकांडगाव अशा 9 ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात यश आले. वाटंगी येथे तीन गटांनी प्रत्येकी 3 जागा मिळवीत सर्वपक्षीय सत्ता मिळवली. तर, देवर्डे येथे मतदारांनी संमिश्र कौल दिला.

भुदरगडमध्ये भगवी लाट

भुदरगड तालुक्यात झालेल्या 45 ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळून भगवा फडकविला आहे. तर यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, स्थानीक आघाडय़ांनी सत्तेत मजल मारली. काँग्रेससह भाजपाने अनेक गावात सत्तेत सहभाग मिळविला आहे. या निवडणुकीत शिवसेना 21, राष्ट्रवादी 14 तर उर्वरीत स्थानिक आघाडय़ांनी 10 ठिकाणी यश मिळविले.

शाहुवाडी तालुक्यातील 13 गावांवर भगवा

शाहुवाडी तालुक्यात 41 पैकी 8 बिनविरोध होऊन, निवडणूक लागलेल्या 33 ग्रामपंचायतींपैकी 13हून अधिक गावांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तालुक्याच्या उत्तर भागात कानसा-वारणा खोऱयात शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण 13 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडे 8, तर स्थानिक आघाडीला 11 जागा मिळाल्या.

पेरीड गावाचे काय होणार?

आजपर्यंत बिनविरोधची परंपरा असलेल्या पेरीड ग्रामपंचायतीत यंदा 9 पैकी 8 जागा बिनविरोध होऊन एका जागेसाठी निवडणूक लागली होती; पण गावाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या निर्णयानुसार येथे प्रतिस्पर्धी उमेदवारांसह एकाचेही मतदान झाले नव्हते. याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या