कोल्हापूर जिल्ह्यात 321 शाळा सुरू, 18 हजार 569 विद्यार्थ्यांची उपस्थिती

कोरोना आणि लाॅकडाऊंनच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आज काही प्रमाणात सुरू झाल्या. येत्या ७ डिसेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभाग आणि संस्था चालकांना सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार २४ माध्यमिक शाळापैकी आज ३२१ शाळा सुरू झाल्या. शाळेत १८ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याची माहिती जि.परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली.

आजपासुन जिल्ह्यातील १ हजार २४ माध्यमिक शाळा पैकी ३२१ शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिल्याच दिवशी १८ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. सर्वाधिक करवीर तालुक्यात ११६ पैकी ५८ माध्यमिक शाळा सुरू होऊन,२ हजार ८१५ विद्यार्थी उपस्थित राहिले.

खालोखाल पन्हाळा तालुक्यात ९६ पैकी ४६ शाळा सुरू होऊन, ३ हजार ५३४ विद्यार्थी उपस्थित राहिले. शिरोळ तालुक्यात ८८ पैकी ३३ शाळा उघडल्या. तर १ हजार ७६८ विद्यार्थ्यांंनी हजेरी लावली. चंदगड सारख्या दुर्गम तालुक्यातही ७५ पैकी ३१ शाळा उघडल्या.१ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कागल तालुक्यातही ८९ पैकी ५८ शाळा सुरू होऊन, २ हजार ८२५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. राधानगरी तालुक्यात ६७ पैकी २६ शाळा सुरू होऊन, २ हजार ६२ विद्यार्थी उपस्थित राहिले. हातकणंगले तालुक्यात १७१ पैकी २१ शाळा सुरू होऊन, १ हजार ७६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. भुदरगड तालुक्यात ५७ पैकी २१ शाळा सुरू होऊन, १ हजार ३२८ विद्यार्थी उपस्थित राहिले. शाहुवाडी तालुक्यात ५५ पैकी २० शाळा सुरू होऊन, १ हजार ३८ विद्यार्थी उपस्थित राहिले. गडहिंग्लज तालुक्यात ७७ पैकी १० शाळा सुरू होऊन, ४१० विद्यार्थी उपस्थित राहिले.

जिल्ह्यात सर्वात कमी प्रतिसाद आजरा तालुक्यात मिळाला. येथे ३५ पैकी केवळ ५ शाळा सुरू होऊन, केवळ १९५ विद्यार्थ्यांंनी हजेरी लावली. कोल्हापूर शहरातही ११२ पैकी केवळ १० शाळा सुरू झाल्या.तर २८९ विद्यार्थ्यांंनी हजेरी लावली.

जिल्ह्यात ४६ शिक्षक व शिक्षकेतर कोरोना बाधीत

जिल्ह्यात एकूण १ हजार ५४ माध्यमिक शाळा आहेत. इयत्ता ९ वी ते १० वी चे एकुण १ लाख १९ हजार ६२७ आणि ११ वी ते १२ वीचे एकुण १ लाख ४ हजार ८१६ विद्यार्थी आहेत.तर ९ हजार ६७९ शिक्षक आणि ५ हजार ४७३ शिक्षकेतर आहेत. यामधील ५ हजार १५५ शिक्षकांची आणि १ हजार ७४२ शिक्षकेतर अशी एकुण ६ हजार ८९७ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. अजुन ४ हजार ५२४ शिक्षक आणि ३ हजार ७३१ शिक्षकेतर अशी एकूण ८ हजार २५५ जणांची तपासणी शिल्लक आहे. तपासणी केलेल्यांपैकी २८ शिक्षक आणि १८ शिक्षकेतर अशा एकुण ४६ जणांचा तपासणी अहवाल कोरोना बाधीत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या