जोतिबा, महालक्ष्मीच्या मंदिरांत बंदिवानांची अविरत भक्तीसेवा; कोल्हापूर कारागृहातील कैदी बनवतात प्रसादाचे लाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जोतिबा या शक्तिपीठांचा महिमा सर्वश्रुत आहे. इथे येणाऱ्या भक्तांना बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून दिला जातो. भक्तांच्या पसंतीस पडलेला हा आरोग्यदायी, चविष्ट व रुचकर असा प्रसादाचा लाडू कुठल्या मिठाईवाल्याकडून नाही, तर  कोल्हापूर कारागृहातील कैद्यांकडून बनवून दिला जात आहे. म्हणून गेल्या दहा वर्षांत या लाडूच्या माध्यमातून प्रशासनाला 11 कोटी 80 लाखांचा महसूल मिळविता आला आहे.

महालक्ष्मी व जोतिबा देवस्थानात भक्तांना दिला जाणारा प्रसादाचा लाडू बनविण्याचे काम कोल्हापूर कारागृहातील कैद्यांकडे देण्यात आले आहे. देवस्थान प्रशासन व कारागृह प्रशासनामध्ये झालेल्या करारानुसार लाडूचा प्रसाद बनविण्याचे काम कैदी करतात. अधीक्षक नागनाथ सावंत, अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, बेकरी निदेशक पूनम कणसकर, कारखाना व्यवस्थापक सी.एम. देवकर तसेच रवींद्र सावंत व विद्या टेंभरे यांच्या मार्गदर्शन-देखरेखीखाली दररोज 50 कैदी बुंदी कळी पाडण्यापासून लाडू बनविण्याचे काम करतात. कैद्यांना लाडू बनविण्याचे प्रशिक्षण व आर्थिक मोबदलादेखील मिळत असल्याचे सांगण्यात आले.

अजिबात हलगर्जीपणा नाही 

दररोज 12 ते 15 हजार लाडू बनवून दोन्ही देवस्थानांत दिले जातात. प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचा लाडू बनविण्यासाठी चणाडाळ, साखर, रिफाईन तेल, हिरवी वेलची, जायफळ, बेदाणे, काजू यांच्यापासून बुंदी कळी पाडली जाते. मग तेल शोषूण घेणाऱया मशीनमध्ये ती बुंदीकळी टाकून त्यातील तेल शोषून घेतले जाते. त्यानंतर कैदी त्या बुंदीपासून लाडू वळतात. या लाडूंची वेळोवेळी कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. अधेमधे जिल्हाधिकारी तेथे अचानक भेट देतात व तेथील पाणी, स्वच्छतेची पाहणी करतात. लाडू बनविणाऱया कैद्यांची नियमित आरोग्य तपासणी होते.