
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे आजपासून सुरू होणाऱ्या खेट्यांवर जिल्हा प्रशासनाने मर्यादा आणली आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने खेट्यांच्या रविवारी श्री जोतिबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून मार्चमधील 7, 14, 21 आणि 28 या प्रत्येक रविवारी मंदिर बंद राहणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्री जोतिबा खेटे आयोजित करू नयेत, यासह कमीतकमी मानकरी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्राद्वारे परवानगी दिली होती. त्यानुसार देवस्थान व्यवस्थापन समितीने खेट्यांच्या रविवारी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुजारी, मानकरी व देवस्थानच्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच पारंपरिक धार्मिक विधी होणार आहेत.


























































