
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरच्या कागलमधील घरावर बुधवारी पहाटे ईडीने छापा टाकला. यावेळी चौकशीसाठी सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक हजर होते. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. तब्बल 12 तास चाललेल्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घराबाहेर पडले. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यातील निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. तसेच हसन मुश्रीफ यांच्या मुलींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. छापेमारी सुरु असताना हसन मुश्रीफ घरी नव्हते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.
मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाईचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी या कारवाईचा निषेध केला. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने गैरव्यवहाराचे आरोप करण्यात होत होते. छापेमारी सुरू असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तपास यंत्रणांनी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त आणला होता.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर समर्थकांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जमण्यास सुरुवात केली. यावेळी समर्थकांनी बॅरिकेड्स बाजूला करून निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना देखील हि परिस्थिती हाताळणे कठीण झाले होते. कार्येकर्ते आक्रमक झाल्यानंतर मुश्रीफ यांनी एका व्हिडिओतून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
दुपारी दोनच्या सुमारास मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ब्रिक्स कंपनीचा आणि आपला काही संबंध नाही तसेच गायकवाड यांच्याशी आपली कुठलीही व्यावसायिक भागीदारी नाही. असा दावा त्यांनी केला. जावयाचा आणि ब्रिक्स कंपनीचा काही संबंध नसल्याचे ते म्हणाले. जे काही पैसे आप्पासाहेब नलवडे कारखान्यांमध्ये लावण्यात आलेले पैसे सर्व हे शेतकऱ्यांचे असून शेअरच्या माध्यमातून ते उभे करण्यात आल्याचे ते म्हणाले. माझे जावई आणि ब्रिक्स कंपनी याचा काहीही संबंध नाही. आज झालेली छापेमारी का केली हे मला समजत नाही. याचा माझ्या कुटुंबाला त्रास नाहक होत आहे. कुटुंब भयभीत होत आहे. हे राजकारणासाठी केले जात आहे. यामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात आहे का? अशी शंका येत आहे.
पुढे ते म्हणाले की, आयकर विभागाचे छापे या आधी पडले होते. माझ्यावर सोमय्या यांनी आरोप केला, की काळा पैसा कारखाना शेल कंपनी माध्यमातून गुंतवला. तसेच ब्रिक्स कंपनी माझी असल्याचा दावा केला, पण त्यात तथ्य नाही. माझ्या जावयाचा आणि ब्रिक्स कंपनीचा संबंध नाही. ग्रामविकास काम टेंडर त्यावेळेस काही त्रूटी होत्या म्हणून रद्द केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडी कारवाईवरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, यापूर्वीही मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले नाही. आताही ईडीकडून धाड टाकण्यात आली. मात्र, विरोधी पक्षातील जे लोक सातत्याने ठामपणे सरकारविरोधात उभे राहतात, त्यांच्या विरोधात विविध यंत्रणांचा वापर करून त्यांना बदनाम किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे.
हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर बोलताना अजित पवार म्हणाले की, सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं आहे. ठाकरे गटातील राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांच्यावर राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे याला राजकीय रंग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहक त्रास कोणाला होता कामा नये. अनिल देशमुखांवर कारवाई झाली, पण कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. संजय राऊत यांच्यासोबत देखील असेच झाले. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाही.
आमदार सतेज पाटील यांनीही तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपकडून मविआ आमदारांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न असून मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित असल्याचा हल्लाबोल सतेत पाटील यांनी केला. पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चित निषेधार्ह आहे.
दरम्यान, 2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी असेही म्हटले होते की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटींचे कंत्राट जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला.
दरम्यान हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून छापेमारीनंतर कागलसह कोल्हापुरातही आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात समर्थकांनी किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळताना निषेधाच्या घोषणा दिल्या.



























































