कोल्हापूरात जमीनमोजणी होणार अचूक अन् गतीने, जिल्हा नियोजन समितीतून ‘भूमिअभिलेख’ला 11 रोव्हर

प्रातिनिधिक फोटो

जमीनमोजणीचे काम गतिशील व अधिक अचूक होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 98 लाख 41 हजार रुपयांची अत्याधुनिक रोव्हर व प्लॉटर मशीन पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते भूमिअभिलेख विभागाला प्रदान करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील जमीनमोजणीचे काम अधिक गतिशील व अचूक होणार आहे.

भूमिअभिलेख विभागासाठी एकूण 11 रोव्हर आणि 6 वाइड फॉरमॅट प्रिंटिंग मशीन (प्लॉटर) खरेदी केली असून, अशा प्रकारची अत्याधुनिक सामग्री उपलब्ध करून देणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. ही प्रणाली जीएनएसएस, जीपीएसवर आधारित असल्याने मोजणी अधिक अचूक व कमी कालावधीत होणार आहे. यासाठी आवश्यक कोअर्स स्टेशनची उभारणी हातकणंगले व आजरा येथे करण्यात आली आहे. उसासारख्या उंच पिकांमध्येसुद्धा मोजणी करणे यामुळे शक्य होणार आहे. डोंगराळ भागात इतर मोजणी साधनसामग्रीच्या आधारे मोजणी करण्यावर मर्यादा येतात; पण या नवीन प्रणालीने हे काम सहजरीत्या करता येऊ शकते.

यावेळी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख वसंत निकम, सुधाकर पाटील, शशिकांत पाटील, किरण माने, नागेंद्र कांबळे, विनायक कुलकर्णी, सुवर्णा पाटील, स्मिता शहा, सुवर्णा मसणे, पल्लवी उगले, सुनील लाळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दीड दिवसात विमानतळासाठी 64 एकरांची मोजणी

उपअधीक्षक भूमिअभिलेख करवीर कार्यालयात रोव्हरचा वापर फेब्रुवारी 2021पासून करण्यात येत आहे. येथील विमानतळासाठी संपादित करावयाच्या 485 हिश्शांमधील एकूण एक हजार 508 जमीनधारकांच्या 64 एकर क्षेत्राची मोजणी अवघ्या दीड दिवसात झाली. पारंपरिक पद्धतीने याच मोजणीसाठी फलक यंत्राच्या साहाय्याने किमान 30 दिवस व इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) मशीनने किमान सहा ते सात दिवस लागले असते. या प्रणालीमुळे मोजणीकामात वेळ आणि मनुष्यबळाची बचत होऊन कामाची गतिमानता व गुणवत्ता सुधारते, अशी माहिती करवीर भूमिअभिलेखचे उपअधीक्षक सुधाकर पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या