महाराष्ट्राच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर भारलेल्या वातावरणात अंत्यसंस्कार

पोलीस व लष्कराकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात करवीर तालुक्याचे सुपुत्र शहीद जवान संग्राम शिवाजी पाटील यांच्या पार्थिवावर आज निगवे खालसा गावात भावपूर्ण व भारलेल्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून हजारो ग्रामस्थांची गर्दी लोटली होती.

शहीद जवान संग्राम पाटील यांचा आठ वर्षांचा मुलगा शौर्य याने मुखाग्नी दिला. यावेळी अमर रहे… अमर रहे… वीर जवान संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शनिवारी रात्री राजौरी जिह्यातील नौशेरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात निगवे खालसाचे सुपुत्र आणि 16 मराठा बटालियनचे जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले होते. शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव आज सकाळी 6.30च्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे दाखल होत असताना, मार्गावरील गावांनी रस्त्याच्या दुर्तफा रांगोळी काढून ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावून आणि फुले वाहून आदरांजली वाहण्यात येत होती.

निगवे खालसा येथील घरी पार्थिव काही काळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. यानंतर सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौकाचौकांत ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते.

पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवान संग्राम पाटील यांना अखेरची मानवंदना दिली. शहीद जवान संग्राम पाटील यांचा आठ वर्षांचा मुलगा शौर्य याने मुखाग्नी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या