
कागलमध्ये सध्या सुरू असलेल्या उरुसात उत्साहाचे वातावरण असतानाच, काल (दि. 24) मध्यरात्री आकाशपाळण्याचा थरार उडवणारा थरकाप पाहावयास मिळाला. आकाशपाळण्याचा रोमांचक क्षण अनुभवायला गेलेले तब्बल 16 जण 80 फुटांवर हवेतच अडकले. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्नटेबल लायडर क्रेनद्वारे अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. मध्यरात्री उशिरापर्यंत तब्बल दोन तास हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.
गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसानिमित्त कागलमध्ये जत्रा भरली आहे. एकीकडे जत्रेत उत्साहाचे वातावरण असतानाच रात्री नऊच्या सुमारास आकाश पाळण्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल 80 फूट उंच हवेतच तो अडकून राहिला. त्यामुळे लहान मुले आणि महिलांसह 16जण त्यामध्ये अडकले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पाळण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी सुखरूप सुटकेसाठी खाली नातेवाईकांसह उरुस कमिटी, पोलीस दल आणि प्रशासनाची चांगलीच घालमेल झाली.
सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्नटेबल लायडर क्रेनला पाचारण करण्यात आले. या अवाढव्य क्रेनद्वारे आकाशपाळण्यात हवेत अडकलेल्या 16 जणांना काही अंतरावर असलेल्या इमारतीवर उतरवून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हा थरार सुरू होता.




























































