तीन तासांचा थरार; कोल्हापुरात बिबट्या जेरबंद

उच्चभ्रू वसाहतीत बिबटय़ा घुसल्याची आणि दोन ते तीन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात आल्याची पुनरावृत्ती कोल्हापूरकरांना आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. सकाळी नागाळा पार्क येथील वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल वुडलॅण्ड आणि महावितरण कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी पोलीस, वन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकाला अडीच ते तीन तास लागले. तत्पूर्वी हॉटेलमधील कर्मचारी तुकाराम खोंदल आणि कृष्णात पाटील हे पोलीस बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झाले, तर जाळी टाकून बिबटय़ाला पकडताना वन विभागाचे दोघेजण जखमी झाले.

नागाळा पार्क ही उच्चभ्रू वसाहत असून, हॉटेल, शाळा, क्लास, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या भागात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाशेजारी रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबटय़ाने हॉटेल वुडलॅण्डच्या गार्डनमध्ये उडी घेतली. बागेत बाकडय़ावर बसलेल्या एका जोडप्याच्या मागून येत बिबटय़ाने बागकाम करत असलेल्या तुकाराम खोंदल या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हॉटेलमधून बिबटय़ाने पलीकडे बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चेंबरच्या एका उघडय़ा झाकणाची बाजू फळीने बंद करून दुसऱ्या बाजूच्या उघडय़ा झाकणातून बाहेर येताच जाळी फेकून बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले.इंजेक्शन दिल्यानंतर बिबटय़ा बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर बिबटय़ाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिबटय़ा कोठून आला? संभ्रम कायम

n यापूर्वीही 1 जानेवारी 2015 रोजी रुईकर कॉलनी येथे उच्चभ्रू वसाहतीत बिबटय़ा आला होता. त्याला कावळा नाका परिसरातील जनावरे पकडणाऱ्या काही युवकांनी जाळी टाकून अत्यंत धाडसाने पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्याला दूर घेऊन जाताना वाटेत बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचे गूढ आजही कायम आहे.