
दक्षिणायनमध्ये होणाऱ्या किरणोत्सवाच्या आज (10 नोव्हेंबर 2025) दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनसळींनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अभिषेक घातला. सूर्याच्या किरणांनी देवीचे मुख उजळून गेले होते. हेमाडपंती स्थापत्य शास्त्राचा हा अद्भुत सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहून अनुभवला.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ आणि हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये तीन दिवसांचा होणारा किरणोत्सव सोहळा समस्त भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. दक्षिणायणमध्ये रविवारपासून किरणोत्सवास सुरूवात झाली. पुर्वसंध्येला केलेल्या पाहणीत सूर्याची मावळतीची किरणे देवीच्या चरणांना स्पर्श करून, खांद्यावर येऊन लुप्त झाली होती. तर काल पहिल्या दिवशीही याची पुनरावृत्ती होऊन, किरणे देवीच्या कानापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीच किरणोत्सव पूर्ण क्षमतेने पूर्ण होण्याचा अंदाज असल्याने, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे महाद्वारातून आत आली. ५.४२ वाजता देवीच्या चरणांना स्पर्श करत किरणे गुडघ्यावर आली. ५.४३ वाजता कमरेपर्यंत तर ५.४५ वाजता खांद्यापर्यंत पोहोचली. ५.४६ वाजता किरणांनी देवीचा चेहरा उजळून निघाला. ५.४८ वाजता किरिटावर पोहचून किरणे लुप्त झाली. तिसऱ्या दिवशी पूर्ण होणारा किरणोत्सव आजच पूर्ण झाल्याने भाविक तसेच अभ्यासक आणि मंदिर प्रशासन अत्यानंद व्यक्त करत होते.




























































