
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या बिनविरोधचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला आहे. भाजप येथे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला असून, 12 एप्रिल रोजी मतदान, तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी होत आहे. काँग्रेसकडून दिवंगत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. जाधव यांचे भाऊ संभाजी जाधव हेदेखील भाजपकडूनच नगरसेवक होते. त्यामुळे जयश्री जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक न लढवता भाजपकडून लढवायला हवी होती. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने पाठिंबा देऊन बिनविरोध निवडून आणावे, तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यांनी काँग्रेसकडून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा उमेदवार उभा करणार आहोत. आम्ही पंढरपूर लढवले, देगलूर लढवले, आता कोल्हापूर लढवू, असेही पाटील म्हणाले.
उमेदवारीचा निर्णय भाजपचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेणार
2014मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढलेले सत्यजित कदम यांनाच भाजपने तिकीट देण्यास प्राधान्य दिले आहे. माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची नावे भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये कदम यांच्या नावाला भाजपकडून पसंती देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय भाजप केंद्रीय पार्लमेंट बोर्ड घेणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितली.



























































