
सासनकाठ्या घेऊन परिते येथील गावकऱयांसोबत आलेल्यांच्या हुल्लडबाजीमुळे दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात पुजारी आणि हुल्लडबाज भाविकांमध्ये रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे मंदिर परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. चूक लक्षात येताच ज्येष्ठ ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकला.
दरम्यान, पुजाऱयांनी मारहाण केल्याच्या एकतर्फी वृत्तामुळे आज जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद पाळण्यात आला. तर, परिते गावातील काही तरुणांनी वाळलेल्या खोबऱयाची वाटी गुलालात घालून काळभैरव मंदिरातील पुजाऱयांना फेकून मारल्यानंतर शाब्दिक वाद होऊन ही हाणामारी झाल्याप्रकरणी कोडोली पोलिसांकडून 30हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येत्या 1 एप्रिल रोजी जोतिबा डोंगरावर चैत्री यात्रा होत आहे. या यात्रेच्या तयारीची लगबग सुरू असून, मानाच्या सासनकाठय़ा दाखल होण्यास सुरुवात होत आहे. रविवारी श्री जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परिते ग्रामस्थही वाजंत्र्यांसह सासनकाठय़ा घेऊन दुपारी डोंगरावर दाखल झाले होते. याच वेळी यातील काही हुल्लडबाजांनी पुजाऱयांची छेडछाड काढण्यासह देवाच्या आरतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. देवस्थान समितीच्या कार्यालयात घुसून साहित्य विस्कटले. तसेच कर्मचाऱयांशी असभ्य वर्तन केले. हुल्लडबाज नशेत असल्याचे निदर्शनास येताच पुजाऱयांचाही संयम सुटला. त्यांनी संबंधितांना पकडून चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. खरा प्रकार समोर येताच परिते गावातील काही ज्येष्ठ ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला.

























































