
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱयांवर रझाकारालाही लाजवेल असा जुलूम करण्यात येत आहे. पण याद राखा! गाठ आमच्याशी आहे. मोजणीला विरोध करणारे शेतकरी, माताभगिनींवर लाठय़ा चालवणारे पोलीस, मोजणीसाठी जबरदस्ती करणाऱया पथकाला तत्काळ निलंबित करा, अशी जोरदार मागणी शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केली. दरम्यान, शेतकऱयांच्या जबरदस्त विरोधापुढे सरकारने गुडघे टेकले असून महामार्गाची मोजणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यभरातून कडाडून विरोध होत आहे. परभणीत महामार्गाविरोधात आंदोलन करण्यात आले त्यावेळी, महामार्गासाठी शेतकऱयांच्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव आहे. आम्ही इंचभरही जमीन महामार्गासाठी देणार नाही, असे गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.
सरसकट शक्तिपीठ रद्द करण्याची मागणी
बागायत शेती उद्ध्वस्त करून शेतकऱयांवर लादला जाणारा पंत्राटदार धार्जिणा बारा जिह्यांतून जाणारा वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग सरसकट रद्द करा, या मागणीसाठी आज शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. सांगली, सोलापूरसह महामार्गाच्या सर्व बारा जिह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. सरसकट शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
































































