कोल्हापूर, शिरोळमध्ये 15 जूनपासून एनडीआरएफची तीन पथके

393

गेल्या वर्षी जिल्ह्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर येत्या 15 जूनपासून कोल्हापूर, शिरोळसाठी प्रत्येकी एक आणि राजापूर, राजापूरवाडी, टाकळी या गावांसाठी एक अशा तीन ठिकाणी एनडीआरएफची तीन पथके दक्षता म्हणून तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या वर्षीचा प्रलयकारी महापुर आणि सध्या पावसाची धुवांधार आणि दमदार सुरुवात त्यात जिल्ह्यातील सर्वच धरणे,मध्यम व लघु प्रकल्पातील चाळीस टक्क्याहुन असलेला पाणीसाठा पाहता, पुन्हा एकदा जिल्ह्याला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पुरबाधीत क्षेत्रात आवश्यक उपाययोजना करण्यात येऊ लागल्या आहेत.गेल्या आठवड्यापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी एनडीआरएफ पथकाची मागणी केली होती.

त्यानुसार जिल्ह्यात सध्या तीन ठिकाणी हि पथके तैनात करण्यात येणार आहेत.या प्रत्येक पथका सोबत 5 बोटी,लाईफ जॅकेट आणि जवान असणार आहेत.जिल्ह्यात सध्या 17 बोटी असून, आणखी 25 बोटी आणि 250 लाईफ जॅकेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील 9 रेस्क्यू फोर्समधील 900 प्रशिक्षित आपदा मित्रांना त्या-त्या गावांत तैनात करण्यात येणार आहे.बोट चालवणे तसेच नागरिकांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही या आपदा मित्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

दरम्यान व्हॉट्सॲप तसेच दूरध्वनीवरुन गावातून स्थलांतरित होण्याबाबत संदेश द्यावा लागत असल्याने,यासाठी एफएम बेस कम्युनिकेशन यंत्रणा करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षीचा अनुभव पाहता,यावर्षी अधिक दक्ष राहून जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तरावर नियोजन सुरु असल्याचेही . जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या