कोल्हापुरात आणखी एक करोनाग्रस्त, बाधित तरुणाच्या कुटुंबातील महिला सदस्यालाही लागण

493
फोटो- प्रातिनिधीक

कोल्हापूरमधील भक्ती पूजानगर, मंगळवार पेठ येथील कोरोनाबाधित तरूणाच्या कुटुंबातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य 31 संशयितांच्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोल्हापूरात सध्या करोनाबाधितांची संख्या दोन झाली आहे. आतापर्यंत 172 पैकी 93 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर 14 जणांचे नमुने फेटाळले आहेत. अजुन 60-62 जणांचे रिपोर्ट अप्राप्त असल्याने, आता कोल्हापुरकरांची धाकधुक वाढली आहे.

२० मार्च रोजी पुणे येथुन मंगळवार पेठेतील भक्ती पूजा नगरमध्ये बहिणीकडे आलेल्या तरुणाला त्रास होऊ लागल्याने, तो छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचे घशाचे द्राव पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोल्हापुरात पहिला करोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली होती. प्रशासनाने भक्ती पुजा नगरच्या पाचशे मीटर परिसराला प्रतिबंध क्षेत्र जाहीर करून, सर्वांना येण्या-जाण्यास पूर्णतः मज्जाव केला. तर तो बाधित तरुण रहात असलेल्या घरातील नातलगांसह आसपासच्या संपर्कात आलेल्या शंभरहुन अधिक जणांची तपासणी केली. विशेषत: नातलगांच्या रिपोर्टकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

खबरदारीची उपाय योजना म्हणून पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील 4 निगेटिव्ह सदस्य व उर्वरीत निगेटिव्ह सदस्यांना स्वतंत्ररित्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पुढील 14 दिवस विलगीकरणात राहून निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी अधिक कडक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या