लोकसभा निवडणूक मतमोजणी : कोल्हापूरच्या ड्राय डेला हायकोर्टात आव्हान; राज्य शासनाने प्रत्युत्तर सादर करण्यासाठी मागितला वेळ

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (4 जून 2024) कोल्हापूर येथे संपूर्ण दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. निकाल जाहीर होईपर्यंतच दारूबंदी असावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

न्या. मिलिंद साठये व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई, उपनगर, रायगड, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे निकाल जाहीर होईपर्यंतच दारूबंदी आहे. तसे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. कोल्हापूरसाठीही अशा प्रकारचे निर्देश खंडपीठाने द्यावेत, अशी विनंती करण्यात आली.

याला सरकारी वकील कविता सोळुंखे यांनी विरोध केला. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ द्यावा, अशी विनंती अॅड. सोळुंखे यांनी केली. अन्य काही शहरांत निकाल जाहीर होईपर्यंतच दारूबंदी आहे. याबाबत न्यायालयाने दिलेले आदेश तपासा व त्यानुसार तुमचे उत्तर सादर करा, असे निर्देश राज्य शासनाला देत खंडपीठाने ही सुनावणी सोमवार, 3 जून 2024 पर्यंत तहकूब केली.

काय आहे याचिका…
केतन बसीन यांनी ही याचिका केली आहे. कोल्हापूर येथे त्यांचे ‘केतन व्हाईन’ दारूचे दुकान आहे. दारूच्या दुकानाचा रीतसर परवाना बसीन यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला येथे दारूबंदी होती. मतमोजणीसाठी दारूबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत. मतमोजणीला संपूर्ण दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण दिवसाचा ड्राय डे रद्द करावा, दारूबंदी केवळ निकाल जाहीर होईपर्यंत असावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.