कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने शनिवारी रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांची चौकशी केली. शुक्रवारी 10 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर सीबीआयने शनिवारी सकाळी संदीप घोष यांची पुन्हा चौकशी करण्यात आली.
पहिल्या फेरीत प्राचार्य घोष यांना महिला डॉक्टरच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली, त्यांनी कुटुंबीयांना माहिती देण्याचे निर्देश दिले होते आणि पोलिसांशी कसे आणि कोणी संपर्क साधला होता. यासंदर्भात घोष यांनी उलटसुलट उत्तरे दिली, त्यामुळे त्यांना शनिवारी सकाळी पुन्हा सीबीआय अधिकाऱयांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीबीआयने सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱया कोलकाता पोलिसांनी एसआयटीच्या दोन सदस्यांची आणि हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांची चौकशी केली होती. सीबीआयचे 12 सदस्यीय विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
केंद्र व राज्य सरकार गंभीर नाही निर्भयाच्या आईचा संताप
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देशभरातील लोक संतापले आहेत. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित निर्भयाच्या आई आशादेवी यांनी या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. अत्याचार करणाऱ्यांना तत्काळ शिक्षा देण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर होत नाही तोपर्यंत देशात अशा रानटी घटना घडत राहतील, असा संताप व्यक्त केला आहे.