कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून घेतली दखल; मंगळवारी सुनावणी

कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार व हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याप्रकरणी मंगळवारी सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा विषय गांभीर्याने विचारात घेतला आहे.

कोलकात्यातील घटनेची न्यायालयाने दखल घ्यावी अशी विनंती करणारे पत्र सर्वोच्च न्यायालयाला पाठवले गेले होते. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने शनिवारी सुमोटो याचिका दाखल करून घेतली.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठामध्ये न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असणार आहे.

कोलकात्यातील आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना घडली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे. देशभरातील डॉक्टरांनी घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

घटनेच्या एका दिवसानंतर पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली. यानंतर पोलीस तपासातील त्रुटींचा हवाला देऊन, कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे वर्ग केले.